वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; पंचनामे करुन आर्थिक मदतीची मागणी

दोन दिवसांपूर्वी कोरची तालुक्यात आलेल्या वादळीवारा व पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरची मुख्यालयापासून 3 किमी अंतरावर असलेल्या जांभळी येथील शेतकऱ्यांचे धान या वादळी पावसात झोपलेल्या स्थितीत गेल्याने खूप नुकसान झाले आहे.

    गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी कोरची तालुक्यात आलेल्या वादळीवारा व पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरची मुख्यालयापासून 3 किमी अंतरावर असलेल्या जांभळी येथील शेतकऱ्यांचे धान या वादळी पावसात झोपलेल्या स्थितीत गेल्याने खूप नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन आर्थिक मदतीची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

    यावर्षी सुरुवातीलाच पावसाने वेळीच दडी मारल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावली होती. मागील तीन ते चार महिन्यांपासून आपल्या शेतावर राबराब राबून त्यांनी जीवाचे रान करीत पीक जगविले. नंतर पावसाची साथ मिळाली व व्यवस्थितपणे उत्पन्न मिळवून आपण आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करू, असे स्वप्न शेतकरी उराशी बाळगून होता. अशातच दोन दिवसांपूर्वी तालुक्यात अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले.

    तालुकास्थळापासून अवघ्या हाकेवर असलेल्या जवळपास 550 लोकसंख्या असलेल्या जांभळी येथील बहुतेक शेतकऱ्यांचे या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कारण उभे पिक हे वाऱ्यामुळे आडवे झालेल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले असून, उत्पन्नात घट होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.