हरवलेले बाळ सापडले रेल्वे फलाटावर; रोहा रेल्वे पोलिसांची मदत

रोहा रेल्वे पोलिसांचे मुख्य आरक्षक बी. के. दिवशे व बी. एस. वर्मा हे फलाट क्रमांक एकवर कर्तव्यावर तैनात असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एक लहान मुलगा रडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ उपनिरीक्षक राकेश पाटीदार यांना दिली.

    रोहा : ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’अंतर्गत (Operation Nanhe Farishte) उल्लेखनीय कामगिरी नुकतीच रोहा रेल्वे पोलिसांनी (Roha Railway Police) केली. यामध्ये रोहा (Roha) रेल्वे स्थानकात अष्टमी (Ashtami) मोहल्यातून घराचा रस्ता चुकून आलेल्या बालकास त्याच्या पालकांकडे (Parents) सुखरूपपणे सुपूर्द केले. यावेळी आपला हरवलेला मुलगा काही तासांत सापडल्याचे आनंद त्या मातापित्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहात होता.

    रोहा रेल्वे पोलिसांचे मुख्य आरक्षक बी. के. दिवशे व बी. एस. वर्मा हे फलाट क्रमांक एकवर कर्तव्यावर तैनात असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एक लहान मुलगा रडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ उपनिरीक्षक राकेश पाटीदार यांना दिली. उपनिरीक्षक पाटीदार हे तत्परतेने दाखल होत त्या मुलाची चौकशी करु लागले. मात्र, ते लहान मुल आपले नाव व पत्ता सांगू शकत नव्हते. याबाबत उद्घोषणा करण्यात आली. मात्र कोणीही पालक समोर आले नाहीत.

    अखेर त्या लहान मुलाला रेल्वे पोलीस चौकीत आणण्यात आले. दरम्यान, संध्याकाळी पाचच्या सुमारास अष्टमी येथील मोहम्मद वाजीद व त्यांची पत्नी हे रेल्वे स्थानक परिसरात आले. ते आपल्या हरवलेल्या लहान मुलाचा शोध घेत असल्याचे त्यांनी रेल्वे पोलिसांना सांगितले. त्यावेळी चौकीत असणारा बालक रेल्वे पोलिसांनी त्यांना दाखविला. त्याला पाहताचा आईवडिलांनी मुलाला ओळखले. आपला मुलगा असून आज दुपारी घराबाहेर खेळता खेळता गायब झाला. तेव्हापासून आम्ही त्याचा शोध घेत असल्याचे पालकांनी सांगितले.