प्रेमविवाह केलेल्या साक्षी गाडे नवविवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या ; नवऱ्यावर गुन्हा दाखल, मंचर येथील घटना

: सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या साक्षी अक्षय गाडे  (वय २०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंचर (ता.आंबेगाव) शहरात असलेल्या माळवाडी येथील संकल्प रेसिडेन्सी सदनिकेत ही घटना घडली आहे.

    मंचर  : सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या साक्षी अक्षय गाडे  (वय २०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंचर (ता.आंबेगाव) शहरात असलेल्या माळवाडी येथील संकल्प रेसिडेन्सी सदनिकेत ही घटना घडली आहे. साक्षीचा वारंवार शारीरीक व मानसिक छळ झाला आहे. तिला आत्महत्या करण्यास पती अक्षय चंद्रकांत गाडे (रा.साकोरे ता.आंबेगाव) कारणीभूत आहे, अशी फिर्याद साक्षीची आई अरुणा संजय गांजाळे (रा.मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.

    फिर्यादीनुसार “साक्षी व अक्षय यांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी न्यायालयात जाऊन लग्न केले. त्यानंतर १२ जून २०२३ रोजी रितीरीवाजानुसार लग्न पार पडले . लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. अक्षयने कॅफेमध्ये साहित्य खरेदीसाठी केलेली पैशाची मागणी पूर्ण केली. त्यानंतर कर्ज झाले आहे असे सांगून दोन लाख रूपयांची पुन्हा मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, ‘मी साक्षीला सांभाळणार नाही, तिला मारून टाकीन. मला कोणीही काही करू शकत नाही. मी यापूर्वी ५० हजार रुपये खर्च करून दुस-या मुलीचा मॅटर सॉल्व्ह केला आहे. त्यामुळे हा मॅटरसुध्दा मी सॉ्ल्व्ह करू शकतो,’ अशी धमकी दिली हाेती. तसेच त्याचे अनैतिक संबंध होते. हे साक्षीच्या निदर्शनास आले. तेव्हा साक्षीने विरोध करायाला सुरुवात केली. अक्षय दारू पिऊन मारहाण करत होता.त्याने साक्षीला भर रस्त्यावर मारहाण केली होती. हा सर्व प्रकार साक्षीने मला सांगितला होता,” असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

    दरम्यान, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंके याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. प्राथमिक स्वरूपात कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा अक्षय गाडे विरुद्ध दाखल करण्यात आला आहे.