गेल्या २० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रेमीयुगुलाला पालघरमध्ये अटक, काश्मीरमधून केलं होतं पलायन

जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu kashmir) पळून आलेल्या प्रेमीयुगुलाला (Lovers Arrested In Palghar) लोकेशन्सच्या आधारे पालघर (Palghar) आणि काश्मीर पोलिसांनी (Kashmir Police) अटक केली आहे. संबंधित प्रेमीयुगुल गेल्या २० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते.

    पालघर : जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu kashmir) पळून आलेल्या प्रेमीयुगुलाला पालघरमध्ये अटक (Lovers Arrested In Palghar) करण्यात आली आहे. संबंधित प्रेमीयुगुल गेल्या २० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर मोबाईल लोकेशन्सच्या आधारे पोलिसांनी या प्रेमीयुगुलाचा शोध घेतला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी आपला फोन बंद ठेवल्यानं त्यांच्याबाबत कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तरुणाने मोबाईल सुरू केला असता, लोकेशन्सच्या आधारे पालघर (Palghar) आणि काश्मीर पोलिसांनी (Kashmir Police) प्रेमीयुगुलांना अटक केली आहे. राजौरी पोलीस (Rajouri ) शुक्रवारी दोघांना घेऊन काश्मीरकडे रवाना झाले आहेत.

    झुल्फिकार मोहमद सादिक खटाना (२२) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. त्याचं घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या प्रेमाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी याला विरोध केला. त्यामुळे प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलांनी थेट काश्मीरमधून पळ काढला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ मार्च रोजी राजौरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

    तेव्हापासून काश्मीर पोलीस या प्रेमीयुगुलाचा शोध घेत होते. दरम्यान आरोपी तरुणाने अनेक वेळा आपला फोन बंद चालू केला होता. त्यामुळे ते नेमके कुठे आहेत, हे समजत नव्हतं. त्यानंतर तरुणानं बरेच दिवस आपला फोन बंद ठेवला. आठ दिवसांपूर्वी त्यानं आपला फोन पुन्हा सुरू केला. यावेळी तो मुंबईतील जोगेश्वरी परिसरात आपल्या एका नातेवाईकाकडे राहत असल्याची माहिती राजौरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी झुल्फीकारशी संपर्क साधून कुठेही न जाण्याचं सांगितलं.पण कारवाई होईल या भीतीने हे प्रेमीयुगुल लोकलमध्ये बसून थेट पालघरकडे रवाना झालं. मागील आठ दिवसांपासून दोघंही याठिकाणी भाड्याच्या घरात राहत होते. राजौरी पोलिसांनी पालघर पोलिसांच्या मदतीने या प्रेमीयुगुला ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी राजौरी पोलीस दोघांनाही घेऊन काश्मीरकडे रवाना झाले आहेत.