प्रेयसीचं नवीन घराच स्वप्न; प्रियकराने केली धाडसी घरफोडी..! पुणे पोलिसांनी कशी केली गुन्ह्याची उकल?

गुन्हे (Crime) शाखेच्या पोलिसांनी (Police) कोंढवा (Kondhwa) भागातील एका धाडसी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्रेयसीच नवीन घराच स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रियकराने घरफोडी केल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे.

    पुणे : शहरात (Pune City) घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू असताना गुन्हे (Crime) शाखेच्या पोलिसांनी (Police) कोंढवा (Kondhwa) भागातील एका धाडसी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्रेयसीच नवीन घराच स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रियकराने घरफोडी केल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले ३७ लाख ३० हजारांचे ६५.५ तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत.

    मल्लप्पा साहेबान्ना होसमानी (वय ३१, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे.

    शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यापार्श्वभूमीवर युनिट पाचचे पथक चोरट्यांचा माग काढत होते. कोंढव्यात गेल्या वर्षी एक धाडसी घरफोडी झाली होती. जवळपास ३८ लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही पडताळले. त्यात एक संशयित ज्युपीटर मोपेड दिसून आली. त्यानूसार दुचाकीची माहिती घेतली. त्यावेळी दुचाकी मल्लप्पा होसमानी हा वापरत असल्याचे समोर आले. त्याची माहिती घेताना तो सराईत वाहन चोरटा आहे, अशी माहिती समजली. त्याच्यावर यापुर्वीचे वेगेवगळ्या पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

    त्याच्यावर संशय वाढल्याने पथकाने कात्रज भागात सापळा रचून मल्लप्पाला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेले ३७ लाख ३० हजार रुपयांचे ६५.५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

    प्रेयसीचं नवीन घराच स्वप्न..!

    मल्लप्पाने नुकताच प्रेम विवाह केला आहे. पण, त्याच्या कुटूंबाला हे आवडले नाही. कुटूंबाने मल्लप्पा याला हाकलून दिले होते. प्रेयसीसाठी नवीन घर घेण्याचे त्याने ठरवले. त्यानूसार एकच धाडसी घरफोडी करण्याचा कट रचला आणि कोंढवा भागातील एक बंद फ्लॅट फोडून घरफोडी केली. या पैशांमधून तो स्वत:चे नवीन घर घेणार होता. त्या घरात पत्नीसह तो राहणार होता. पण,त्यापुर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    गुन्ह्याचा असा लागला छडा…

    कोंढवा भागात झालेल्या या घरफोडीचा तपास करताना एका सीसीटीव्हीत संशयित ज्युपीटर दिसली होती. या ज्युपटरची माहिती काढली. ती ज्या दिशेने आली व परत गेली, त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही तपासले. काही सीसीटीव्हीत तो कैद झाला होता. पण, आरोपी ओळखू येत नव्हता. पोलिसांनी त्याच्या दुचाकीवर बसण्याच्या स्टाईलवरून त्याचा अंदाज घेत या मल्लप्पाला बेड्या ठोकल्या आहेत. मल्लप्पावर हिंजवडी, लोणी काळभोर व चंदननगर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.