देशामध्ये गेल्या दहा वर्षांत महागाईचा दर कमी; पीयुष गाेयल यांचा दावा

गेल्या दहा वर्षांत देशातील महागाईचा दर हा साडे चार ते सात टक्के इतकाच राहीला आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य व उद्याेगमंत्री पीयुष गाेयल यांनी व्यक्त केले.

    पुणे : गेल्या दहा वर्षांत देशातील महागाईचा दर हा साडे चार ते सात टक्के इतकाच राहीला आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य व उद्याेगमंत्री पीयुष गाेयल यांनी व्यक्त केले. भारत आज जगातील पाचवी माेठी अर्थव्यवस्था असलेला देश असून, पंतप्रधान नरेंद्र माेदी हे पुन्हा सत्तेत आले तर त्यांच्या नेतृत्वाखाली जगातील तिसरी माेठी अर्थव्यवस्था आपली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    काेळसा, स्पेक्ट्रम, टेलिकाॅम भ्रष्टाचाराचे प्रकार उघड

    भाजप सत्तेवर येण्यापुर्वी देशाची अर्थव्यवस्था गंभीर झाली हाेती असे नमूद करीत, गाेयल म्हणाले, ‘‘ अर्थव्यवस्था ढासळत असतानाच काेळसा, स्पेक्ट्रम, टेलिकाॅम आदी भ्रष्टाचाराचे प्रकार उघड झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले. सरकारने अर्थव्यवस्थेचा पाया मजबुत करण्यासाठी वित्तीय तुटीचा दर कमी राखण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत महागाईचा दर हा साडे चार ते सात टक्के इतकाच राहीला. व्याजाचे दरही कमी झाले. परदेशी गुंतवणुकीला प्राेत्साहन दिले. परदेशी गुंतवणुक दरवर्षी वाढत गेली आहे. याचा परिणाम म्हणून निर्यात देखील वाढली आहे.

    सर्व सामान्य, गरीबांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक याेजना राबविल्या, यामध्ये माेफत घरे दिली, उज्वला गॅस सारखी याेजना राबविली अशा अनेक याेजना राबवून सर्व सामान्यांचा स्तर उंचाविला, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. देशातील पायाभुत सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले. रस्ते बांधणी माेठ्या प्रमाणावर झाली, विमानतळांची संख्या दुप्पट झाली, बंदरांची निर्मिती केली गेली. यामुळे आज आपला देश हा जगातील पाचवी अर्थ व्यवस्था म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. दहा वर्षापुर्वी आपली अर्थव्यवस्था ही जगातील शेवटच्या पाचव्या स्थानावर हाेती. ’’