‘बारसू रिफायनरीवरून खालच्या पातळीचं राजकारण सुरु, दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं’; उदय सामंत यांचे आवाहन

बारसूवासियांचे गैरसमज दूर केले जातील. शेतकऱ्यांशी बोलू शकतो, अजून वेळ आहे. बारसूबाबत ठाकरे गटाचे मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसूमधील जागा उद्धव ठाकरेंनी सुचवली होती.

    मुंबई : बारसू रिफायनरीचा (Barsu Refinery) मुद्दा पेटत आहे. त्यात बारसू रिफायनरी सर्वेक्षण स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलनही सुरू आहे. त्यानंतर आता यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

    उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘बारसूवासियांचे गैरसमज दूर केले जातील. शेतकऱ्यांशी बोलू शकतो, अजून वेळ आहे. बारसूबाबत ठाकरे गटाचे मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसूमधील जागा उद्धव ठाकरेंनी सुचवली होती. प्रकल्पांबाबत बोलणारे आता बारसूबाबत का? बोंबलत आहेत. रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनी स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहिले. बारसूवासियांमध्ये दडपशाही केली जाणार नाही. ठरवून केलेले हे राजकीय षडयंत्र आहे. प्रकल्प आणि आंदोलनाबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली होती’.

    खालच्या पातळीचं राजकारण सुरु

    बारसू रिफायनरीवरून सध्या महाराष्ट्रात खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनीही ही जागा सुचवली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. या पत्रामुळेच सर्वेक्षण सुरु झालं. पण बारसूबाबत राजकारण नको. दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं, समर्थन करावं, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

    आंदोलक आक्रमक

    बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली होती.