जमिनीत कमी ओलावा, रब्बी हंगाम संकटात; आंबेगाव तालुक्यात पेरणी क्षेत्र घटणार?

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी रब्बी हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहेत.

  रांजणी : मान्सूनचा पाऊस वेळेत न पडल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील खरीप पिकाला फटका बसला. त्यात अपुरा पाणीसाठा आणि तीव्र ऑक्टोबर हिटमुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी तालुक्यातील रब्बी हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहेत.

  तालुक्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच

  आंबेगाव तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात पाऊस वेळेवर पडला नाही. त्यामुळे खरीप हंगाम लांबला. कोरडवाहू पेरणी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम जमिनीत कमी ओलावा असल्याने संकटात येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान यंदा अपेक्षित न पडलेला पाऊस जलसाठ्यांची दयनीय अवस्था, उपशावर असलेल्या विहिरी, बोअरवेल आणि ओलावा नसलेल्या जमिनी यामुळे तालुक्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच आहे. एखादा अवकाळी पाऊस जर झाला नाही तर रब्बी पिकाच्या पेरणी सोबतच फळबागांवर संकटाची कुऱ्हाड पुन्हा एकदा कोसळणार आहे.

  मान्सून परतल्यानंतर तालुक्याच्या बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान झाले आहे. हस्त नक्षत्राचा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस बरसला मात्र आता स्वाती नक्षत्रात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी ही परिस्थिती नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर हिटचा चटका वाढल्याने तालुक्यात उन्हाची ताप वाढली आहे. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम आहे.

  गहू, हरभरा क्षेत्र घटण्याची दाट शक्यता

  मुळातच चालू वर्षी कमी प्रमाणात पाऊस बरसला, त्यामुळे भूपृष्ठावरील सिंचन स्रोत्र नाही. पुरेसे पाणी नाही दुसरीकडे वाढते तापमान जमिनीतील ओलावा नाहीसा करत आहे. तापमान आतापासूनच ३५° सी च्या पुढे जात आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो आहे. परिणामी यंदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा क्षेत्र घटण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यात कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारीचा पेरा करण्याशिवाय पर्याय नसून हे पीक देखील कितपत हाती लागते याविषयी शंका आहे.

  शेतकऱ्यांची चिंता वाढली

  तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणातील पाण्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. डिंभे धरणात पाणी उपलब्ध असल्यामुळे धरणातील पाणी शेतकऱ्यांना भविष्यकाळात वरदाण ठरू शकते. वास्तविक चालू वर्षीचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा कठीण आहे. पाण्याच्या खोल चाललेल्या पाणी पातळीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम आता रब्बीच्या पेरण्यांवरही होऊ पाहत आहे. पावसाअभावी पुरेशा प्रमाणात जमिनीत ओल नसल्याने रब्बी हंगामातील काही भागातील पेरण्या देखील रखडल्या आहेत.