मनोहर जोशी यांच्या निधनाने निष्ठावंत, अनुभवी, सुसंस्कृत नेतृत्व हरपले! नाना पटोले यांची श्रद्धांजली

राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाने एक निष्ठावंत, अभ्यासू, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाने एक निष्ठावंत, अभ्यासू, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

    मनोहर जोशी यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या मनोहर जोशी सरांनी अत्यंत निष्ठेने आणि मेहनतीने मुंबईचे नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला.

    आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढऊतार पाहिले पण कधीही निष्ठा आणि विचारांशी तडजोड केली नाही. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी ते लढत राहिले.

    राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतीक, कला क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जोशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे पटोले म्हणाले.