लम्पीचे राज्यात थैमान, १८७ जनावरे दगावली, ठाणे, कोल्हापूर, साताऱ्यातही लम्पीचा प्रवेश

राज्यात ऑगस्ट महिन्यात प्रथम जळगावमध्ये लम्पीची लागण जनावरांमध्ये झाल्याचे आढळून आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा २५ जिल्ह्यांवर लम्पीचे सावट पसरले. राज्यात लम्पीचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने गावगावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.

  मुंबई, नवराष्ट्र न्युज नेटवर्क – देशात थैमान घातलेल्या पशुमधील लम्पी चर्मरोगाने राज्यात थैमान घातले आहे. राज्यसरकारने केलेल्या विविध उपाययोजना या रोगापुढे असफल ठरल्याचे चित्र दिसत असून राज्यात लम्पी रोगामुळे आतापर्यत १८७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २५ जिल्ह्यांमधील ९६३ गावांमधील ७,३५६ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

  राज्यात ऑगस्ट महिन्यात प्रथम जळगावमध्ये लम्पीची लागण जनावरांमध्ये झाल्याचे आढळून आले. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा २५ जिल्ह्यांवर लम्पीचे सावट पसरले. राज्यात लम्पीचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने गावगावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्याच्या सुरवातीला ६४ इतके जनावरांच्या मृत्यूदर असणारे प्रमाण वाढून ते या आठवड्याच्या सुरवातीला १८७ इतके झाले आहे. परंतु, लसीकरण मोहीमेमुळे २७३० इतके पशुधन बरे झाले असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

  पशुसंवर्धन आयुक्त यांनी या आठवड्यात राज्याला ५० लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत. गोशाळा, मोठे गाठे आणि जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण आणि लस उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आल्याची माहिती दिली. त्यानुसार राज्यात ४८ लाख ९३ हजार २०० इतक्या लस उपलब्ध अजूनही २९ लाख पशुधनाचे लसीकरण करणे बाकी आहे.

  लम्पी आजारामुळे जनावरे दगावत असल्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या आजारावरील नियंत्रणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून १ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. यामधून जनावरांचे औषधोपचार, सिरिंज, निडल, पीपीई किट, बाधित क्षेत्रातील गुरांच्या गोठ्यात औषध फवारणी. उपकरणे आणि इतर आवश्यक उपाय योजना यावर खर्च करण्यात येणार आहे.

  मृत्यू झालेले जिल्हयातील पशुधन

  जळगाव – ६४
  अहमदनगर – २४
  धुळे – ७
  अकोला – २८
  पुणे – १७
  लातूर – ३
  सातारा – ९
  बुलडाणा – १०
  अमरावती – १३
  कोल्हापूर – ७
  ठाणे – १
  सांगली – १
  वाशिम – १
  नागपूर – १
  जालना – १