लम्पि बधितांना अतिरिक्त प्रतिजैविके नकोत – सीईओ जितेंद्र डुडी

जिल्ह्यात सध्या ४९६६ जनावरे लम्पि बाधित आहेत, ३४९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर ३०२२ जनावरांवर उपचार सुरू असून १५९५ जनावरे बरी झाली आहेत

    सांगली – लम्पि बाधित जनावरांच्या उपचारामध्ये खासगी पशुवैद्यकीय सेवकांनकडून अतिरिक्त विकांचा वापर केला जातो याचे परिणाम जनावरांच्या आरोग्यावरती होत आहेत, अशी माहिती तज्ज्ञांकडून मिळाली असल्याने केवळ शासकीय सूचनानुसार उपचार पद्धतीचा अवलंब करावा कोणत्याही अतिरिक्त प्रतिजैविकांचा वापर करू नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

    लम्पि बाधित जनावरांच्या उपचाराचा आढावा आणि प्रशिक्षण जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी घेतले. यावेळी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि विभागाला त्यांनी लम्पि उपचार संदर्भात सूचना दिल्या. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग उपस्थित होते.

    मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, जिल्ह्यात सध्या ४९६६ जनावरे लम्पि बाधित आहेत, ३४९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर ३०२२ जनावरांवर उपचार सुरू असून १५९५ जनावरे बरी झाली आहेत, शासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे, गरज असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ देखील देण्यात आले आहे, मात्र काही ठिकाणी खाजगी पशुवैद्यकीय सेवकांकडून अतिरिक्त प्रतिजैविकांचा वापर केला जात आहे, यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक भार सोसावा लागतो आहेच, शिवाय जनावरांच्या प्रतिकारशक्ती वरती देखील याचा दुष्परिणाम होत आहे. खाजगी पशुवैद्यकीय सेवकांनीही शासकीय उपचार पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.