मढी यात्रेस सुरुवात; लाखो भाविकांनी घेतले कानिफनाथांचे दर्शन

कोरोना विषाणूच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेसाठी राज्यासह आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांनी नाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. संपूर्ण मंदिर परिसर कानिफनाथांच्या जयघोषाने व डफाच्या आवाजाने दुमदुमून गेला.

    पाथर्डी : कोरोना विषाणूच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेसाठी राज्यासह आसपासच्या राज्यातील लाखो भाविकांनी नाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. संपूर्ण मंदिर परिसर कानिफनाथांच्या जयघोषाने व डफाच्या आवाजाने दुमदुमून गेला. दर्शनासाठी भाविकांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह जाणवत होता.

    चैतन्य कानिफनाथाची यात्रा होळी, रंगपंचमी व फाल्गुनी अमावस्या अशा तीन टप्प्यात होते. राज्यातील अठरापगड जातींचे श्रद्धास्थान भटक्यांची पंढरी म्हणूनही यात्रेची राज्याला ओळख आहे. रंगपंचमीच्या दिवशी नाथांनी संजीवन समाधी घेतली म्हणून सर्वाधिक गर्दी या दिवशी होते. नाशिक, पुणे, ठाणे, पनवेल संपूर्ण मराठवाडा या भागातून अनेक भाविक देवांच्या काठ्या म्हणजे मोठे बांबू सजवून वाजत-गाजत मढी येथे आणतात. तेथे मंदिराभोवती वाजत-गाजत प्रदक्षिणा घालून विशिष्ट धार्मिक विधी करतात. सुमारे १२ हजार मंडळे व भाविकांनी काल रात्री पासूनच काठ्यांच्या मिरवणूका काढल्या होत्या. दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी पुरवले.

    सकाळच्या वेळी काठी मिरवणूका व दर्शनासाठी भाविकांची पैठण दरवाजाच्या पायथ्याला एकच गर्दी उसळून चेंगराचेंगरी सुरू झाली होती. मात्र, देवस्थानचे अध्यक्ष व उपस्थित विश्वस्तांनी बॅरिकेट्स तोडून गर्दीचा मार्ग मार्ग मोकळा केल्याने मोठा अनर्थ टळला. गर्दीचा फायदा घेत खिसेकापू, मोबाईल चोर व साखळी चोरांनी मोठ्या प्रमाणावर हात साफ केला.

    प्रमुख यंत्रणांची धावपळ

    तिसगाव मढी रस्ता वाहतूक कोंडीमुळे पूर्णपणे ठप्प झाला होता. एकेरी वाहतुकीचे प्रशासनाचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीमुळे रखरखत्या उन्हात भाविकांना ताटकळत राहावे लागले. एकीकडे शासनाची यात्रा बंदी तर दुसरीकडे यात्रेसाठी भाविकांचा महापूर आल्याने महसूल पोलिस प्रशासनासह सर्वच प्रमुख यंत्रणांची धावपळ उडाली. देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड व सर्व विश्वस्तांनी अहोरात्र सेवा देत मदतकार्य व नियोजनावर लक्ष केंद्रित केले. वैशिष्टपूर्ण डफ व ढोलांचा आवाज चौफेर घुमून संपूर्ण यात्राच तालावर पुढे सरकत होती.