संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

राज्यसभेच्या 56 जागांवर होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या 6 जागा आहेत. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदार असतात आणि पक्षीय संख्याबळानुसार प्राधान्यक्रमाने यात मतदान केले जाते.

  मुंबई : लोकसभेच्या जागावाटपाचे घोडे अडले असतानाच राज्यसभेच्या उमेदवारीने विरोधी महाविकास आघाडीची (मविआ) मोठीच गोची करून ठेवली आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येकी एक जागा रिक्त होत आहे; परंतु शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुभंगल्याने महाविकास आघाडीकडे जेमतेम एकच जागा जिंकण्याएवढे आमदार उरले आहेत. आता ही जागा कोणी लढवायची, असा पेचप्रसंग उभा ठाकणार आहे.

  राज्यसभेच्या 56 जागांवर होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या 6 जागा आहेत. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदार असतात आणि पक्षीय संख्याबळानुसार प्राधान्यक्रमाने यात मतदान केले जाते. भाजपच्या व्यूहरचनेमुळे 2022 मध्ये अशाच राज्यसभा निवडणुकीत मतदान घ्यावे लागले होते. तेव्हा शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. तर संजय राऊत थोडक्यात बचावले होते. पुढे दोनच दिवसांनी ठाकरेंचे सरकारही कोसळले होते.

  नारायण राणेंना डच्चू, देवरांची वर्णी

  शिंदे गट आणि अजितदादा गटाला एकेक जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे. शिंदेंची जागा मिलिंद देवरांना दिली जाऊ शकते. भाजपच्या तीन जागांवर कोण असेल हे आताच स्पष्ट नाही. परंतु, नारायण राणे यांनी लोकसभा लढवावी असा मतप्रवाह आहे.

  हे खासदार होणार निवृत्त

  कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, प्रकाश जावडेकर (भाजप).