कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा बाेलबाला ; जनसुराज्य, शिंदे गट पुरस्कृत आघाडीचा १६ जागांवर विजय

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून जनसुराज्य, शिंदे गट पुरस्कृत आघाडीच्या मदतीने १६ जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत बाजार समितीच्या १८ पैकी १६ जागांवर सुमारे ४ हजारांहून अधिक मतांनी महाविकास आघाडी विजयी झाली आहे.

    कोल्हापूर : विरोधी शिवशाहू परिवर्तन आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे, तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

    कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्यावर महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात विजय झाल्यानंतर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला.
    एकूण सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. बाजार समिती निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्थेचे १४ हजार १३३, ग्रामपंचायतीतील ५ हजार ७३३, अडते व्यापारी गटाचे मतदान १२१७, माथाडी तोलाई गटाचे ८९४ मतदान आहे. यापैकी एकूण २० हजार २८० मतदान झाले होते.

    मतदाराकडून मतपेटीतून पैसे परत
    कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भलताच प्रकार समोर आला. मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात घालून मतपेटीत टाकून दिले आहेत. ते पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली आहे. मतपेटीत एका स्वाभिमानी मतदाराने मिळालेले हजार रुपये मतपेटीत टाकले होते. पाकिट उघडले असता त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळून आल्या.

     गडहिंग्लज बाजार समिती बिनविरोध
    गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.