आपत्तीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज; प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे प्रतिपादन

गतवर्षी औद्योगिक वसाहतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही रसायनांचा पाण्याशी संपर्क आल्याने स्फोट झाले होते. या घटना टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या, पावसाळ्याच्या काळात रसायनांचा साठा कमी ठेवण्याच्या सूचना कारखानदारांना देण्यात आल्या आहेत.

  महाड : संभाव्य पूरपरिस्थिती (Possible Flood Situation) आणि नैसर्गिक आपत्तीचा (Natural Disasters) मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपाययोजनांना अंतिम स्वरूप प्राप्त झाले असून, संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले असल्याची माहिती महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड (Mahad Prantadhikari Pratima Pudalwad) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

  संभाव्य आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पुदलवाड यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे, तहसिलदार सुरेश काशिद, पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई, मुख्याधिकारी महादेव रोडगे, गटविकास अधिकारी पोळ, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख उपस्थित होते.

  यावेळी बोलताना ॲटोमॅटीक वेदर स्टेशन्स कार्यरत करण्यात आली असल्याची माहिती पुदलवाड यांनी दिली. महाड तालुक्यातील आकले आणि पाले येथील पुलावर पाण्याची पातळी मोजणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली असून, महाड शहरातील भोईघाटावर ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

  रसायनांचा साठा कमी ठेवण्याच्या सूचना

  गतवर्षी औद्योगिक वसाहतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही रसायनांचा पाण्याशी संपर्क आल्याने स्फोट झाले होते. या घटना टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या, पावसाळ्याच्या काळात रसायनांचा साठा कमी ठेवण्याच्या सूचना कारखानदारांना देण्यात आल्या आहेत. महापूर आल्यास कारखान्यांमध्ये जे कामगार अधिकारी अडकले असतील त्यांची त्याच कारखान्यात राहण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. ७० ते ८० टक्के कारखान्यांनी या उपाययोजना पूर्ण केल्या असल्याची माहितीही पुदलवाड यांनी दिली.

  ४९ सुरक्षित इमारती निश्चित

  महाड शहरात नागरिकांना प्रभागनिहाय प्रशिक्षण देण्यात आले आहे. महापुराची पातळी वाढल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी ४९ इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये या इमारतींची यादी लावण्यात आलेली आहे. व्यापारी संघटनांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुकानामध्ये दैनंदिन गरजेइतकाच मालसाठा ठवून उर्वरित साठा उंच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.

  गाळ काढण्याचे काम थांबविले

  महाड नगरपरिषदकडे स्वतःच्या दोन बोटी असून, रेस्क्यू टीमकडे चार बोटी आहेत. नावीन्यपूर्ण योजनेतून बोटींसह बचावासाठी आवश्यक असलेले अन्य साहित्य येत्या दोन दिवसांत उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नदीपात्राातील गाळ काढण्याचे काम थांबविण्यात आले असल्याची माहितीही पुदलवाड यांनी दिली. १० ते ११ लाख ब्रास गाळ या पात्रातून काढावयाचा आहे. त्यापैकी तीन लाख ७५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

  एनडीआरएफची एक तुकडी तैनात

  एनडीआरएफचा कायम स्वरूपी तळ जरी स्थापन होऊ शकला नसला तरी पावसाळ्याचे चार महिने एनडीआरएफची एक तुकडी महाड शहरामध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आपत्ती काळात मोबाईल यंत्रणा सुरू रहावी यासाठी मोबाईल कंपन्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिओ कंपनी वगळता सर्व मोबाईल कंपन्यांकडून या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे पुदलवाड यांनी सांगितले.