'It is my moral responsibility to elect all candidates of Ajit Pawar': Mahadev Jankar

  बारामती : महायुतीतून राष्ट्रीय समाज पक्षाला परभणीची जागा मिळण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणणे ही माझी नैतिक जबाबदारी असून, धनगर समाज सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

  महादेव जानकर बारामती दौऱ्यावर

  महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महादेव जानकर बारामती दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बारामती मध्ये त्यांनी पत्रकारांशी सवाद साधला. यावेळी महादेव जानकर म्हणाले,२०१४ मध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांना आपण कडवी झुंज दिली.

  सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार

  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असून बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे . आपण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या बाजुने असल्याने धनगर समाज बांधव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे.

  आज बारामतीत सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करण्याचे धनगर समाजाला आवाहन केले. परभणी मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर मी बारा मतदारसंघाचा दौरा केला असून केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, बारामती, इंदापूर, दौंड येथे मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. महायुतीतून रासपला परभणीची जागा मिळण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अजित पवार यांचे सर्व उमेदवार निवडून यावेत, हे माझे कर्तव्य आहे.

  भाजपच्या सरकारमध्ये बारामतीचा खासदार पाहिजे

  भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही. हे विनाकारण बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. सर्वांनी अपप्रचारापासून सावध राहावे, भाजप ४०० जागांवर दावा सांगत आहे.मात्र त्यांच्या २०० जागा येणार नाहीत ,असे विरोधक बोलत आहेत, असे विचारल्यावर इंडिया आघाडीचे नेते कोण कुठे आहे. त्यांनाच माहिती नाही उगाच काही बोलू नये, असे म्हणत येणाऱ्या भाजपच्या सरकारमध्ये बारामतीचा खासदार असावा ही विनंती करण्यासाठी आलो असल्याचे जानकर यांनी सांगितले.

  भाजपचे नेते धनगर अरक्षणावर बोलत नाही यावर असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, भाजपचे सरकार असताना धनगर समाजाला घटनेत बावीस सवलती फडणवीस यांनी दिल्याचे सांगत केंद्रात देखील या सवलती लागू करणार आहे.काँग्रेसने चाळीस वर्षे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव वापरले, धनगर समाजाला वंचित ठेवले, भाजपने एमलसी, मंत्रिपद, खासदारकी दिली तुम्ही कारखान्याचे व्हाईस चेअरमनपद शिवाय काय दिले, असा सवाल जानकर यांनी केला.

  सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित
  पंकजा मुंडे,सुनेत्रा पवार माझ्या बहीण असून त्यांना जास्तीत जास्त माताधिक्याने संसदेत पाठवावे, अशी विनंती यावेळी केली. मी आज बारामतीत खासदार म्हणून आलो आहे. लवकरच कॅबिनेट मंत्री म्हणून अजित पवारांकडे जेवायला येणार आहे. माझ्यावर प्रेम करणारा धनगर बांधव हा अजित पावरांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे.