महादेव जानकर परभणीतूनच लढणार; बारामतीतून लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वतः आपण परभणी लोकसभा मतदार संघातूनच लढणार असल्याचे दैनिक नवराष्ट्र शी बोलताना स्पष्ट केले. जानकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे ते बारामती लोकसभा मतदार संघातून लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

  बारामती/ अमोल तोरणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वतः आपण परभणी लोकसभा मतदार संघातूनच लढणार असल्याचे दैनिक नवराष्ट्रशी बोलताना स्पष्ट केले आहे. जानकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे ते बारामती लोकसभा मतदार संघातून लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

  सध्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या भावजय व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीतून लढणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या घोषित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला जनसंपर्क दौरा सुरू केला आहे. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होणार असल्याने या लढतीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  मात्र गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अनपेक्षितरित्या महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेत लोकसभा निवडणूक महायुतीतून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला परभणी किंवा माढा लोकसभा मतदारसंघांमधून ते लढणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जानकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. जानकर यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीच्या चर्चेमुळे सुनेत्रा पवार यांचे नाव मागे पडले होते. यासंदर्भात अधिकृत दुजोरा कोणीही दिलेला नव्हता.

  यासंदर्भात महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार नसून, परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून लढणार असल्याचे दैनिक नवराष्ट्रशी बोलताना जाहीर केले. जानकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे ते बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

  दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून माढा किंवा परभणी लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महादेव जानकर स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात देखील होते, गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक देखील झाली होती. त्याचबरोबर अनेक वेळा जानकर यांनी भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षरीत्या महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीमध्ये जाण्याचे संकेत दिले होते.

  मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबत जानकर यांची बैठक संपन्न होऊन त्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र ते माढा किंवा परभणी मधून लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र दोन दिवसांपासून अचानकपणे महायुतीच्या माध्यमातून जानकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अजून देखील जानकर यांच्याच नावाची चर्चा आहे.

  दरम्यान २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीच्या माध्यमातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होऊन सुप्रिया सुळे फक्त ७० हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुन्हा आच्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पुन्हा उतरवण्याचा भाजपचा डाव असल्याची चर्चा होती. प्रसार माध्यमांनी देखील जानकर यांच्या बारामतीतील उमेदवारीबाबत निर्णय झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते.

  परंतु महादेव जानकर यांनी आपण परभणी लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत निश्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे.