महाराष्ट्र बँकेच्या वसुली पथकाच्या एजंटची पालखी महामार्गावर हत्या; दौंड तालुक्यातील वासुंदेजवळ घडली थरारक घटना

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दौंड तालुक्यातील वासुंदे भागात महाराष्ट्र बँकेच्या वसुली पथकाच्या एजंटची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  पाटस : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दौंड तालुक्यातील वासुंदे भागात महाराष्ट्र बँकेच्या वसुली पथकाच्या एजंटची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   

  ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. प्रविण मळेकर (वय ३०, रा. गुरुवार पेठ, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना शनिवारी (दि. २)रात्री ७.४५ वाजण्याच्या आसपास वासुंदे भागात पेट्रोल पंपा समोर घडली.

   

  मळेकर हे शनिवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन बँक आँफ महाराष्ट्रच्या बारामती शाखेच्या रिकव्हरी नोटीस वाटप करण्यासाठी घरातून बारामती परिसरात गेले होते. ते नोटीस बजावून घरी जात असताना रात्री पावणे आठ वाजण्याच्या आसपास अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने हल्ला करून त्यांचा खून केला.

   

  दरम्यान, मळेकर यांना उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. याप्रकरणी मळेकर यांचा मुलगा ऋषिकेश यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे करीत आहेत.

  तपासासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. लवकरच या गुन्हयाचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली.