Maharashtra Bhushan Award announced to veteran actor Ashok Saraf, Chief Minister Eknath Shinden announced

  Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती. हम पांच या मालिकेतला त्यांचा अभिनय केला आहे. निवेदिता जोशी या त्यांच्या पत्नी आहेत.

  विदूषकाच्या भूमिकेद्वारा पहिले पाऊल

  मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं.

  दादा कोंडकेंसह अभिनय

  काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच ‘पांडू हवालदार’ या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला. तसंच ‘राम राम गंगाराम’ या दोन चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. त्या दोन सिनेमांमधला अभिनयही लोकांच्या लक्षात आहे.

  अशोक सराफ यांनी अभिनय करु नये असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं
  अशोक सराफ यांच्या अभिनयाला त्यांच्या वडिलांनी सुरुवातीला विरोध केला होता. त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी असं अशोक सराफ यांच्या वडिलांना वाटत होतं. ज्यानंतर अशोक सराफ बँकेत काम करत होते. पण नाटक काही सुटलं नाही. त्यानंतर अशोक सराफ यांना जशी बक्षीसं मिळू लागली तसा त्यांच्या वडिलांचा विरोध मावळला. त्यांच्या लक्षात आलं की खूप चांगला अभिनय आपला मुलगा करतो आहे. त्यामुळे त्यांनी नंतर विरोध केला नाही. आत्तापर्यंत अशोक सराफ यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘पांडू हवालदार’ सिनेमातली ‘सखाराम हवालदार’ ही भूमिका नशिबाने मिळाली. ४५ पेक्षा जास्त वर्षे होऊन या सिनेमाची जादू आजही कायम आहे. कोल्हापूरला सिनेमाचं शुटिंग होतं. एक किस्सा स्वतः अशोक सराफ यांनीही सांगितला होता. कोल्हापूरला जेव्हा शुटिंगला बोलवण्यात आलं तेव्हा पहिले दोन ते तीन दिवस माझं काम नव्हतं त्या कालावधीत मी दादा कोंडकेंचं निरीक्षण केलं. त्यानंतर ती भूमिका साकारली असं अशोक सराफ यांनी सांगितलं होतं.