hsc result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना गाेसावी यांनी बुलढाणा येथे झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं.

    मुंबई: आज दुपारी दाेन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीचा निकाल (Maharashtra HSC Exams Result 2023) पाहता येणार आहे. दरम्यान बारावीची परीक्षा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Paper Leak Case) सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील केंद्रावर गणिताचा पेपर फुटला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. त्यानंतर चाैकशी समिती स्थापन झाली. मात्र आजपर्यंत एसआयटीने (SIT) दिलेल्या अहवालात काय हाेतं हे समजू शकले नाही.

    सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरून गणिताचा पेपर फुटला आणि याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आठ लोकांना अटक करण्यात आली हाेती. यातील दोन जण संस्था चालक असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली हाेती. या प्रकरणाची गांभीर्यता बघता सरकारने पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांच्या नेतृत्वात एक एसआयटी समिती स्थापन केली. मात्र एसआयटीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. तसेच अटक (arrest) करण्यात आलेल्या आठ संशयित आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येऊनही त्यांचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात का ठेवलाय? असा प्रश्न उपस्थित होतो.

    विशेष म्हणजे या प्रकरणात बोर्डाने पेपर फुटलाच नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र बुलढाण्यातील भारत विद्यालय केंद्रप्रमुखात असलेले शिक्षक घोंगटे यांनी पेपर फुटल्याची व पेपर सुरू असताना माध्यमांच्या कॅमेरासमोर पेपर दाखवूनही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही.  राज्यात पेपर फुटीचा हे मोठं प्रकरण असतानाही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

    शिक्षण मंडळाचं म्हणणं काय?
    दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना गाेसावी यांनी बुलढाणा येथे झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं. या प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कार्यवाही हाेईल. मात्र विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवता येत नाही असेही गाेसावी यांनी स्पष्ट केले.