devendra fadnavis

राज्य सरकार हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्राकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटांना अनुदान दिले होते.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2023-24 या वर्षाकरता  आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये मराठी भाषा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी विविध घोषणा करण्यात आल्या. यामध्ये श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ , विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे करण्याची घोषणा केली. (Maharashtra Budget 2023)

मराठी भाषा विद्यापीठ
मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या (Chakradhar Swami) नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावं ही मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत होती.

मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30 हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे.

मराठी भाषा युवक मंडळे, कलाकार कल्याण मंडळ
विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे केली जाणार आहेत. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे स्थापन केली जाणार आहेत. कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना होणार आहे.

विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त 10 कोटी रुपये दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. स्व. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा करण्यात आला आहे.

नाट्यगृहांच्या देखभालीसाठी तरतूद
सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी, गोरेगाव आणि कोल्हापूर चित्रनगरीसाठी 115 कोटी, विदर्भ साहित्य संघाला 10 कोटी रुपयांची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. तसेच सर्व नाट्यगृहांच्या देखभालीसाठी 50 कोटींची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.

राज्य सरकार हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्राकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटांना अनुदान दिले होते. त्यांनी 41 मराठी चित्रपटांना आज 12 कोटी 71 लाखांचे अनुदानाचं वाटप केलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मनोरंजन क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पामध्ये सर्व क्षेत्रांचा विचार करुन घोषणा करण्यात आल्या आहेत.