मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नोव्हेंबरमध्ये आमदारांसह अयोध्या दौरा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

अयोध्या दौऱ्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अयोध्येला जाणार आहेत.

    मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पक्षातील आमदार आणि मंत्र्यांसह शिंदे अयोध्येत जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अयोध्येचा दौरा केला होता. आता शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

    वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे जाऊन शिंदे रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करतील, असा अंदाज आहे.

    दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातले नेते अयोध्या दौरा करण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरे जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीत पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यावेळी देखील राज ठाकरेंच्या दौऱ्याची जोरदार चर्चा झाली होती. आता अयोध्या दौऱ्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. कारण एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.