महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

राज्यात आज २६३ नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients In Maharashtra) नोंद झाली आहे. तसेच २४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

    मुंबई: गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील (Maharashtra Corona Update) कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे. राज्यात आज २६३ नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients In Maharashtra) नोंद झाली आहे. तसेच २४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील २ कोरोनाबाधितांचा (Corona Death) मृत्यू झाला आहे. गुरुवारी राज्यात २३१ रुग्णांची नोंद झाली होती तर २०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते.

    राज्याचा मृत्यूदर १.८७ टक्के आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ७७,३१,०२९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.११ टक्के इतके झाले आहे. राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही १४५५ इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे ८९८ सक्रिय रुग्ण हे मुंबईत असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या २६६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत ८,०५,०९,४७० प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.

    देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात २८४१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही वाढ ०.४९ टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या २४ तासात देशात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात २ हजार ८२७ नवे रुग्ण आढळले होते तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.