भाजपच १ नंबरचा पक्ष, वाचा शिंदे आणि ठाकरे गटाचं काय झालं? कुणाला किती जागा?

ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवाडीनुसार भाजपला सर्वाधिक 2102 ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळालाय. तर शिंदे गटाला 803 ग्रामपंचायतींमध्ये मिळालाय.

  मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर झालाय. राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झालंय. या सत्तांतरादरम्यान आणि नंतर आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींवर राज्याची जनता काय विचार करते, राज्यातील जनतेचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा आहे की महाविकास आघाडीच्याप्रती सहानुभूती आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक ही चांगली संधी आहे.. यामध्ये शिंदे-फडणवीस यांच्या युतीला ग्रामीण भागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळालाय.

  ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवाडीनुसार भाजपला सर्वाधिक 2102 ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळालाय. तर शिंदे गटाला 803 ग्रामपंचायतींमध्ये मिळालाय.

  भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला आतापर्यंत 2996ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं चित्रय. तर महाविकास आघाडीला 2950 जागांवर विजय मिळालाय. मतमोजणी अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी आल्याशिवाय नेमका कुणाचा खरा विजय झालाय हे म्हणता येणार नाही. पण मतमोजणी आता जवळपास पूर्ण होत आलीय. या निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाला कितवं स्थान आहे हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं ठरेल. या निवडणुकीत शिंदे गट हा शेवटून दुसरा ठरला आहे. एकनाथ शिंदे गटाला आतापर्यंत 803 ग्रामपंचायतींवर यश मिळाल्याची माहिती समोर आलीय.

  राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडलं. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील होत्या. विदर्भात एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं

  ग्रामपंचायत निवडणुकीत यश, अपयश नसतं – उद्धव ठाकरे
  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर समाधान की असमाधान असा प्रश्न नाही. या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात तर काही ठिकाणी गावकरी एकत्र येऊन निवडणुका लढवत असतात. त्यामुळे हे कोणत्याही एका पक्षाचं यश, अपयश नाही. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक असं काही नसतं. वर्षानुवर्षं आपण हे आकडे ऐकत आहोत. याच्यात फोलपणा किती हे कालांतराने कळतं. आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा आहे असं उद्धव ठाकरे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

  नाशिकमध्ये छगन भुजबळांना धक्का
  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. सात पैकी केवळ एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला यश मिळवता आलां आहे.

  अकोला जिल्ह्यात वंचितने वर्चस्व राखले
  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना हादरे बसले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक ठिकाणी नव्यांना संधी मिळाली आहे. काही जागांवर प्रस्थापितांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. निकाल जाहीर होताच राजकीय पक्षांनी विजयी उमेदवारांवर दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. जिल्ह्यात वंचितने वर्चस्व राखले असून त्याखालोखाल भाजपला जागा मिळाल्या आहेत.

  अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना दणका
  पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी २२१ पैकी ९२ ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला आहे. भाजपाला अवघ्या ३८ ठिकाणी विजय मिळाला आहे.

  निकालानंतर दोन गट भिडले; विजयी उमेदवाराचा मृत्यू
  जळगाव जिल्ह्यात 122 ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून या निवडणुकीच्या निकालाला जामनेर मध्ये मात्र गालबोट लागले आहे. टाकळी येथे विजयी उमेदवार गावातील मंदिरावर देव दर्शनासाठी जात असताना गावातील दोन गट भिडले व या दरम्यान झालेल्या हाणामारी व दगडफेकीत विजयी पॅनलच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  – कोणाला किती जागा
  भाजपा 2234
  राष्ट्रवादी 1448
  इतर 1263
  काँग्रेस 841
  शिंदे गट 803
  ठाकरे गट 661

  युतीनूसार जागा

  भाजपा-शिंदे गट 3037
  मविआ 2950
  इतर 1263