“महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागलीय, ती  काढून टाकावी लागेल…”; गोपीचंद पडळकरांची खालच्या भाषेत शरद पवारांवर टीका, पुढे म्हणाले…

यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती, पण यांनी देशासाठी किंवा राज्यासाठी काही कामं केलेली नाहीत. फक्त स्वत:ची घरं भरुन घेतली, अशी बोचरी टिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.

चंद्रपूर : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भाजपात आल्यापासून पडळकर आक्रमक झाले असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि शरद पवारांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तरी त्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली आहे. “महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागलीय, ती कीड काढून टाकावी लागेल” असं पडळकर यांनी म्हणत शरद पवारांवर बोचरी टिका केली आहे. यावेळी त्यांनी बावनकुळे यांचे कौतुक करताना, “भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरतायत, असं म्हटलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. यावेळी या सभेत पडळकरांनी शरद पवारांवर टिका केली.

चार वेळा मुख्यमंत्री झाले पण…

दरम्यान, पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात आणि देशात अनेक वर्षे यांच्याकडे सत्ता होती. मात्र यांना पाणी देता आलं नाही. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. यांना का नाही वाटलं दुष्काळी भागात पाणी द्यावंस? हे केंद्रीय कृषी मंत्री होते. यांना राज्यात पैसा आणावंस वाटलं नाही”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ती कीड महाराष्ट्रातून काढून टाकावी लागेल”, अशी जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. त्यामुळं त्यांच्या या टिकेला राष्ट्रवादीकडून प्रतिउत्तर येणार असून, वातावरण चिघण्याची शक्यता आहे.

…तर वेगळा देश तयार करा

गोपीचंद पडळकरांनी पुढे बोलताना खोचक व मिश्किल टोला देखील अजित पवार व शरद पवार यांना लगावला. अजित पवार यांना जर मुख्यमंत्री करायचा असेल तर तीन वेगळी राज्य करावी लागतील. एक लवासा, एक बारामती, आणि एक मगरपट्टा. लवासाचा मुख्यमंत्री जयंत पाटील, लवसाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळेआणि बारामतीचा मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. हे तिन्ही राज्य एकत्र करून देश करा. त्याचा पंतप्रधान शरद पवारांना करा”, अशी मिश्किल टिप्पणी गोपीचंद पडळकर यांनी केली. यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती, पण यांनी देशासाठी किंवा राज्यासाठी काही कामं केलेली नाहीत. फक्त स्वत:ची घरं भरुन घेतली, अशी बोचरी टिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.