
पुणे : महाराष्ट्राचे वैभव असलेली महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा यंदा धाराशिवमधील तुळजाभवानी क्रीडा मैदानावर येत्या १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. आता यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार रामदास तडस आणि ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक व पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार असल्याची माहिती दिली होती. आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने आमचीच स्पर्धा अधिकृत असून, ती स्पर्धा बेकादेशीर अनधिकृत असल्याचे सांगून महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला धक्का दिला आहे.
आमचीच स्पर्धा अधिकृत
१९६१ सालापासून सुरू असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचीच ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धाच अधिकृत असल्याचे परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले. ही अधिकृत कुस्ती स्पर्धा १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान धाराशीव येथे होणार आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी दुसर्या कुठल्याही अनधिकृत स्पर्धेत सहभागी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटूंना केले.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांनी घेतला पुढाकार
या स्पर्धेसाठी विजेत्या मल्लासाठी स्कॉर्पिओ गाडी व मानाची गदा व अन्य विजेत्या मल्लांसाठी दोन कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.
अनधिकृत संघटनेला बरखास्त संघटनेचा आधार
गैरकारभार आणि गैरवर्तनामुळे राष्ट्रीय कुस्ती महासंघावर (डब्लूएफआय) केंद्र सरकार व हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेने जानेवारीमध्ये बरखास्तीची कारवाई केली आहे. याचबरोबर जागतिक कुस्ती संघटनेनेही राष्ट्रीय कुस्ती महासंघाची संलग्नता काढून घेतलीय. मात्र, तरीही महाराष्ट्रातील एक अनधिकृत राज्य कुस्ती संघटना बरखास्त ‘डब्लूएफआय’चे सलग्नता पत्र दाखवून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सर्वाधिकार अबाधित ठेवले आहेत. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे अधिकारही याच कुस्तीगीर परिषदेकडे आहेत. त्यामुळे धाराशीव येथे होणारी ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हीच अधिकृत स्पर्धा असेल, असेही बाळासाहेब लांडगे यांनी स्पष्ट केले.
कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित
स्पर्धेच्या आयोजनबाबत हातलाई कुस्ती संकुल येथे रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह कार्यालयीन सचिव ललीत लांडग, अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद भक्त, तांत्रिक सचिव बंकट यादव, विजय भराटे यांच्यासह धाराशिव जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत भव्य स्पर्धा
यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलावर येत्या १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. स्पर्धेसाठी २० गट सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील कुस्तीपटू, कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत ही भव्य स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी विजेत्या मल्लांना मोटारसायकली, चांदीची गदा, मानचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्थानिक कुस्तीपटूंनाही महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून संधी दिली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
४५ वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी
धाराशिव शहरात सलग पाच रंगणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ४५ वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. ४५० खेळाडू माती व ४५० खेळाडू गादी गटात असे ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत. माती व गादी अशा वेगवेगळ्या वजन गटात स्पर्धा पार पडणार असल्याची घोषणा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने केली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान
धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळत आहे. साधारणपणे एक लाख प्रेक्षक बसतील अशा स्वरूपाची असणार गॅलरी उभारण्यात येणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व धाराशिव कुस्ती तालीम संघ त्याबाबत आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अंदाजे २ कोटी रुपयांची बक्षिसे
प्रथम बक्षीस चांदीची मानाची गदा व ३० लाख रुपये किमतीची स्कर्पिओ गाडी, द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर असणार आहे. २० गटात स्पर्धा होणार असून, प्रत्येक गटातील प्रथम विजेत्या मल्लाला बुलेट आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्तजनार्थ १२ लाख रुपयांची बक्षिसे असणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांना स्पर्धेसाठी निमंत्रित करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.