
महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) विजयी झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता समोर येत आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) विजयी झाले आहेत. तर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) आणि शुभांगी पाटील (Subhangi Patil) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सध्या सत्यजीत तांबे हे आघाडीवर आहेत.
मतमोजणीनंतर सायंकाळी तीन जागांचा निकाल जाहीर झाला असून, इतर दोन जागांवर मतमोजणी सुरू आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. त्यांना नागपूरमध्ये मविआ समर्थित उमेदवाराकडून पराभव स्विकारावा लागला आहे. तर, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे यांचा विजय झाला आहे. अमरावती पदवीधर, नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी भाजप पिछाडीवर आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात नेमकं काय?
अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दोन टर्मपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. रणजित पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बळीराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर बाळाराम पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत.