महाराष्ट्र पोलीस सक्षम; कोयता गँगवर वचक बसविणार, स्पेशल स्कॉडची स्थापना; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. २०२२ हे साल पोलीस दलासाठी चांगले गेले आहे. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तर, नक्षलविरोधी कारवाईत देखील चांगली बाब आहे.

    अक्षय फाटक, पुणे – पुण्यासह राज्यभरात गाजलेल्या कोयता गँगला आवर घालण्यासाठी “स्पेशल स्कॉड”ची स्थापना करण्यात आली असून, याद्वारे कोयत्याने पुणेकरांवर दहशत माजविणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाणार आहे,पुण्यात गाजत असलेल्या कोयता गँगबाबत पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी ही माहिती दिली. पुणे पोेलिसांकडून या स्कॉडची स्थापणा केली असून त्याद्वारे दहशत माजविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

    पुण्यातील वानवडीत असणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन (एसआरपीएफ) येथे होत असलेल्या ३३ व्या महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा २०२३ चे उद्घाटन पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    -राज्यातील पुर्ण पोलीस गटातून खेळाडू सहभागी
    उद्घाटन कार्यक्रमानंतर रजनीश शेठ हे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती देताना म्हणाले, राज्यात ३ वर्षांनी ही स्पर्धा होत आहे. कोरोनामुळे तीन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नाही. यामध्ये राज्यातील पुर्ण पोलीस गटातून खेळाडू सहभागी होतात. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंना नॅशनल स्पर्धेसाठी निवड केली जाते. शेवटच्या वेळी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पोलीस स्पर्धेत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक मिळाला होता. त्यात तीस मेडल महाराष्ट्र पोलिसांना मिळाले होते. यातून पोलीस फिट राहतील तसेच खेळाडू देखील तयार होती, असा या स्पर्धेचा उद्देश आहे.

    – पोलीस आयुक्तांनी घेतलेली कोयता गँगची दखल
    राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. २०२२ हे साल पोलीस दलासाठी चांगले गेले आहे. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तर, नक्षलविरोधी कारवाईत देखील चांगली बाब आहे. गडचिरोली तसेच गोंदिया भागातील कामगिरी उत्तम आहे.
    पुण्यातील कोयता गँगबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, कोयता गँगची दखल पोलीस आयुक्तांनी घेतलेली आहे. त्यांनी स्पेशल स्कॉडची नेमणूक केली आहे. या गुन्ह्यांना पायबंद कसा घातला जाईल, याबाबतची उपाययोजना सुरू केली आहे. लवकरच पुण्यातील कोयता गँगला पायबंद घातला जाईल.

    मुख्यमंत्री आलेच नाही; खेळाडूंचा हिरमोड..!
    रामटेकडीतील एसआरपीएफ ग्राऊंडवर पोलीस क्रिडा स्पर्धा ७ जानेवारी रोजी सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (दि. ११ जानेवारी) आयोजन केले होते. मात्र, काही कारणास्तव मुख्यमंत्री उद्घाटन समारंभास येऊ शकले नाही. त्यामुळे पोलीस दल व खेळांडूचा हिरमोड देखील झाल्याचे पाहिला मिळाले. तीन वर्षांनंतर स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेचे वेगळेपण देखील यंदा आहे.