एकनाथ शिंदे अडचणीत? विधानसभा उपाध्यक्षांनी सांगितला ‘हा’ नियम, वाचा सविस्तर

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Ekanatah Shinde) यांनी शिवसेनेविरोधात (Shivsena) बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यात सत्तेचा संघर्ष उभा ठाकला आहे. ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दुहेरी संकटाला सामोरं जावं लागत आहे.

    मुंबई : विद्यमान सरकारमध्ये असलेले नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आता वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार असून आणखी १० आमदार सोबत येतील, असा दावा शिंदे यांनी काल गुवाहटीच्या विमानतळाबाहेर (Guwahati Airport) केल्यानंतर आज शिवसेनेचे आणखी सहा आमदार गुवाहाटीला गेले आणि शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत.

    शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आपल्यासोबत असल्याने गटनेतेपदी अजय चौधरी (Shivsena Group Leader Ajay Chaudhari) यांची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे यांनी केला. आता यावर विधासनसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Legislative Assembly Deputy Speaker Narhari Zirwal) यांनी भाष्य केलं आहे.

    एकनाथ शिंदे यांनी गटनेतेपदावर दावा करणारं पत्र पाठवलं असलं तरी त्यावरील सहीवर आमदार नितीश देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. “मी इंग्रजीत सही करतो, मात्र पत्रावर माझ्या नावे करण्यात आलेली स्वाक्षरी मराठीत असल्याचा देशमुख यांनी दावा केला आहे. त्यामुळे मला हे प्रकरण तपासावं लागेल, असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.

    शिवसेनेने एकनाथ शिंदेंना बंड केल्यानंतर गटनेतेपदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली. यावर शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आमच्याकडे असल्याने चौधरी यांची नियुक्ती आपल्याला मान्य नाही. त्यामुळे चौधरी यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा शिंदे यांनी दावा केला आहे. शिंदे यांच्या गटाने शिवसेनेचेच विधीमंडळाचे मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे.

    या संपूर्ण प्रकरणाबाबत भाष्य करताना नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचा नियम सांगितला आहे. पक्षप्रमुखाने गटनेत्याची नेमणूक करायची असते आणि गटनेत्याने प्रतोद म्हणून नियुक्ती करायची असते असं झिरवळ यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवलं असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली. याविषयीचं पत्र आपल्याला मिळालं असल्याचं झिरवळ यांनी सांगितलं.