एमकेमांना पाण्यात पाहणारे, आता एकमेकांच्या मदतीला

आज आता त्याच विखे यांचे नातू खा. डॉ. सुजय विखे पाटील भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतही डॉ. विखे भाजपचेच उमेदवार होते.

    अहमदनगर : वर्षानुवर्षे जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारे, नव्या आघाड्या आणि युतीमुळे एकमेकांच्या मदतीला धाऊन जात असल्याचे चित्र यावेळच्या निवडणुकीत दिसून येत आहे. विखे आणि पवार या दोन कुटुंबांतील राजकीय वैमनस्य संपूर्ण राज्याने पाहिले आहे. मात्र आता पवार यांचे काही भिडू भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत.

    राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या समवेत आणि जिल्ह्याच्या राजकारणात पवार समर्थकांसोबत विखे पाटील कुटुंबांचे कधीच सूत जुळले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची आघाडी असतानाही हे दोन नेते सतत एकमेकांवर कुरघोड्या सुरू असायच्या. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत नेते पद्मश्री बाळासाहेब विखे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. जिल्ह्यातील पवार समर्थकांना विखे यांच्या राजकारणाचा हिसका वेळोवेळी सहन करावा लागला आहे.

    आज आता त्याच विखे यांचे नातू खा. डॉ. सुजय विखे पाटील भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतही डॉ. विखे भाजपचेच उमेदवार होते. त्यावेळी राष्ट्रवादी एकत्र होती. त्यामुळे विखे यांच्या विरोधात शरद पवार, अजित पवार व दोन्ही पवारांचे समर्थक टोकाचा प्रचार करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप डॉ. विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार होते. राष्ट्रवादीत फूट पडल्याने अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी झाला. आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून अजित पवार समर्थकांनी डॉ. विखे यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यावेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले आ. संग्राम जगताप यांच्याकडे नगर शहर विधानसभा मतदारसंघाची विशेष जबाबदारी असून, ते व त्यांचे समर्थक डॉ. विखे यांच्या प्रचारासाठी कष्ट घेत आहेत.

    आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेले व जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविलेले हसन मुश्रीफ यांनी त्यावेळी विखे कुटुंबावर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. आता तेच मुश्रीफ विखे यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी मेळावे घेणार आहेत. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले विनायक देशमुख कायम विखे समर्थक म्हणून आेळखले जातात. विखे कोणत्याही पक्षात असले तरी देशमुख हे विखे गटातील, असे समीकरणच होते. आता तेच विनायक देशमुख भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाल्याने उघडपणे विखे यांचा प्रचार करण्याचा आनंद लुटत आहेत. नगर शहरात कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक उघडपणे विखे यांचा प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रभागात विखे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.