छगन भुजबळांचे राजकारण केंद्राकडे वळणार? ‘कमळ’ चिन्हावर लढण्याचा भाजपकडून प्रस्ताव

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून घोषित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे भुजबळ यांचे राजकारण राज्यातून केंद्राकडे वळणार आहे.

    नाशिक : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने काही उमेदवारांची नावे जाहीर देखील केली आहेत. मात्र काही जागांच्या उमेदवारांची चाचपणी अद्याप सुरु आहे. दरम्यान, नाशिकमधील लोकसभा जागेचा गुंता अद्याप महायुतीकडून सोडवण्यात आलेला नाही. त्यामध्येच आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून घोषित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे भुजबळ यांचे राजकारण राज्यातून केंद्राकडे वळणार आहे.

    महायुतीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना घड्याळ चिन्हावर लढवण्यास अजित पवार गट आग्रही होता. मात्र ही जागा भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच आता साताऱ्याऐवजी सध्या शिंदे गटाकडे असलेल्या नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणामध्ये बदल दिसणार असून भुजबळ हे आता केंद्राकडे वळणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ हे महायुतीमधून लोकसभा लढवणार असल्याची शक्यता असून भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मीडिया रिपोर्टमधून सांगितले जात आहे. . भारतीय जनता पक्षाने (BJP) छगन भुजबळ यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अजित पवार यांनी भुजबळ पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.

    छगन भुजबळ यांना माध्यमांनी त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “नाशिकच्या जागेवर अजून बोलणी सुरू असून तीनही पक्ष चर्चा करत आहेत. नाशिकच्या जागेसाठी अनेक जण मुंबई जाऊन आलेत. चर्चेनंतर कुणीही उमेदवार ठरले तर आम्ही काम करणार आहे. भुजबळ कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या असे मी सांगितले नाही. माझं नाव तर तुम्हीच चर्चेत आणले. फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी मी मागणी केली आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.