
Maharashtra Politics : विकास निधीच्या मुद्द्यावरून मराठवाड्यातील प्रमुख जिल्हे असलेल्या औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे दिसून आले. विकास निधीच्या मुद्द्यावरून तीनही पक्षांचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीतील बंड हे राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारे हे दोन्हीही बंड होते. परंतु, पहिले बंड हे ज्या कारणामुळे झाले असे बोलले जात होते, त्याचे एकमेव कारण म्हणजे विकास निधी पुरेसा दिला जात नाही. आता सत्तेत गेल्यानंतर पुन्हा विकासनिधीवरूनच सत्ताधारी तीन पक्ष आमने-सामने आल्याचे दिसून येत आहे.
ज्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, ज्या मुद्द्यावरुन शिवसेनेत फूट पडली, त्याच विकास निधीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा सरकारमधील तीनही पक्षाचे नेते आमने-सामने येताना पाहायला मिळत आहेत. निधी मिळत नसल्याने औरंगाबादमध्ये शिंदे ठाकरे गटाचा वाद पाहायला मिळाला, तर दुसरीकडे जालन्यातील (Jalna) शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळत नसल्याचे म्हणत भाजप नेते आणि पालकमंत्री अतुल सावे यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे विकास निधीच्या मुद्यावरून सत्ताधारी तीनही पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पाहा जालन्यात नेमके काय झाले
सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, याच बैठकीवरून शिंदे गटाने नाराजी व्यक्त करीत आपल्याला निधी देताना अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. तर, विकास निधी मंजूर करीत असताना शिंदे गटाच्या लोकांना डावलल्याचा आरोप करीत शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, जिल्हा संपर्कप्रमुख पंडित भुतेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सावे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच घेराव घातला. तसेच, विकास निधी देताना आमच्यावर अन्याय होत असून, असा अन्याय आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तसेच यावेळी शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यामुळे सावे देखील चांगलेच संतापले होते. विशेष म्हणजे, मध्यस्थी करणाऱ्या भाजपचे आमदार नारायण कुचेंनाही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
पालकमंत्र्यांकडून असभ्य वर्तन केल्याची टीका
दरम्यान, यावर शिंदे गटाचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिकिया दिली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी पालकमंत्री सावे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. असे व्हायला नको होते, मात्र झाले. जे घडले त्याचे समर्थन मी करीत नसलो, तरीही सभ्यतेची भाषा पालकमंत्री यांनी ओलांडली आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सावे यांना असा अपमान करण्याचा काही अधिकार दिलेला नाही. सावे सातत्याने अपमान करण्याचा प्रयत्न करतात. आमचे पदाधिकारी त्यांचे हक्क मागण्यासाठी गेले होते, पण सावे यांचे असं वागणं बरे नव्हे, असे खोतकर म्हणाले.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मांडणार मुद्दा
विकास निधी देताना दुजाभाव होत असून, याची नोंद कागदोपत्री आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली जाणार असल्याचेदेखील अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात विकास निधीच्या मुद्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.