गोंदियातील धक्कादायक प्रकार, ट्रकमध्ये तब्बल १२० विद्यार्थ्यांना जनावरांसारखे कोंबले

गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले आहेत.

    नागपूर – आदिवासी शाळेतील १२० मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियातून समोर आला आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे. तीन मुलींना उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले आहेत. ट्रकमधील गर्दीमुळे विद्यार्थी गुदमरल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले.

    गोंदिया तालुक्यातील शासकीय आदिवासी शाळा, मजितपूर येथील विद्यार्थ्यांना अमानवी पद्धतीने ट्रकध्ये कोंबण्यात आले होते. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी शाळा प्रशासनातर्फे नेले जात होते. तिथून परतत असताना हा प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली.