
पुणे : महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना यांच्या वतीने आयोजित पहिल्या आयटीएफ पॅरा ट्रायथलॉन चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत महाराष्ट्राच्या अथर्व पाटील याने अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले.
11 राज्यांतून 30 खेळाडूंनी घेतला सहभाग
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पॅरा प्रकारात 11 राज्यांतून 30 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये स्पर्धकांना पोहणे (250मीटर), सायकलिंग (6.2किलोमीटर) आणि धावणे (2.4किलोमीटर) मध्ये पूर्ण करावयाचे होते.
अथर्व पाटील याने पटकावला प्रथम क्रमांक
स्पर्धेत महाराष्ट्राच्या अथर्व पाटील याने 28 मिनिटे 54 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, एसएससीबीच्या बिणू गणानादशान (29:21 सेकंद) आणि रमेश गांता (34:17 सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
अनेक मान्यवर उपस्थित
स्पर्धेतील विजेत्या संघाला पदके व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष दयानंद कुमार, मानद सचिव राजेंद्रन निंबालटे, तांत्रिक अधिकारी प्रभात शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनचे सदस्य यज्ञेश्र्वर बागराव आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात पॅरा एथलीटससाठी पहिलीच स्पर्धा आयोजित
महाराष्ट्रात पॅरा एथलीटससाठी अशा प्रकारची पहिलीच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जून 2023मध्ये उझबेकिस्तान येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा ट्रायथलॉन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी रजत व कांस्य पदकाची कमाई केली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पदके जिंकण्याची संधी
भारताला ट्रायथलॉनपेक्षा पॅरा ट्रायथलॉन (अपंगांच्या) स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पदके जिंकण्याची संधी आहे. पॅराट्रायथलॉन प्रकारातील अनेक भारतीय खेळाडू युवा आहेत. प्रत्येक ट्रायथलॉन स्पर्धेबरोबर पॅरा ट्रायथलॉ़न स्पर्धेचे आयोजन कऱण्याची आमची योजना असून, ती आता यशस्वी होताना दिसत आहे. त्याचबरोबर अपंग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेण्यासाठीही आम्ही भरपूर प्रोत्साहन आणि मदत करत आहोत, असे भारतीय ट्रायथलाॅन महासंघाचे विकास अधिकारी हरिष प्रसाद यांनी सांगितले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार);
1. अथर्व पाटील(महा, – 00:28:54 सेकंद);
2. बिणू गणानादशान(एसएससीबी – 00:29:21 सेकंद);
3. रमेश गांता रमेश (एसएससीबी- 00:34:17 सेकंद).