एनडीए ओपन स्क्वॅश 2023 स्पर्धेत महाराष्ट्राच्या चैतन्य शहा, जनीत विधी यांना विजेतेपद

  पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृतमहोत्सवी (75 वर्षे) स्थापना वर्षानिमित्त आयोजित एनडीए ओपन स्क्वॅश 2023 स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या चैतन्य शहा याने, तर महिला गटात जनीत विधी यांनी विजेतेपद संपादन केले.
  यांनी संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली
  स्क्वॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया(एसआरएफआय) यांच्या मान्यतेखाली नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला येथील इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्क्वॅश कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत चैतन्य शहा याने सर्व्हिसेसच्या अव्वल मानांकित वैभव चौहानचा 11-08, 11-08, 13-11 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सर्व्हिसेसच्या अव्वल मानांकित वैभव चौहानने निष्कल द्विवेदीचा 11-05, 11-08, 08-11, 11-06 असा तर, चैतन्य शहा याने सर्व्हिसेसच्या दुसऱ्या मानांकित हर्ष कुमारचा 11-07,03-11, 06-11, 11-03, 11-04 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली.
  या स्पर्धेला एसआरएफआय 2स्टारची मान्यता
  महिला गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित जनीत विधी हिने तेलंगणाच्या सहाव्या मानांकित आर्या द्विवेदीचा 11-05, 11-02, 11-04 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. याआधीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जनीत विधीने तेलंगणाच्या पाचव्या मानांकित ऐश्वर्या पायनचा 11-01, 11-02, 09-11, 11-08 असा तर, तेलंगणाच्या सहाव्या मानांकित आर्या द्विवेदीने महाराष्ट्राच्या एलिना शहाचा 11-08, 11-13, 11-08, 07-11, 11-09 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेत एकूण 198 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळाडू, सर्व्हिस ऑफिसर, एनडीएमधील कॅडेट यांचा समावेश होता. तसेच, या स्पर्धेला एसआरएफआय 2स्टारची मान्यता होती.
  स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक
  स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण व्हाईस ऍडमिरल अजय कोचर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सह सचिव डॉ. दयानंद कुमार, महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.