महाराष्ट्रीय मंडळ या शिक्षण संस्थेचा शताब्दी वर्षात पदार्पण, क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न

  पुणे : कै. कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रीय मंडळ या शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात संस्थेला क्रिडा विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी पत्रकार परीषदेत दिली.

  १९२४ साली संस्थेची स्थापना

  मराठी तरुणांना व्यायामाची गोडी लागावी, भारतीय सैन्य दलात त्यांना स्थान मिळून त्यांच्या हातून देशसेवा घडावी या उद्देशाने कॅप्टन दामले यांनी १९२४ साली संस्थेची स्थापना केली होती. अशी ही महाराष्ट्रीय मंडळ संस्था येत्या विजयादशमीला शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे.

  नव्या बोधचिन्हाचे अनावरण

  यानिमित्ताने संस्थेच्या वतीने पुढील वर्षभरात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम व संस्थेच्या भविष्यातील योजनांविषयीची माहिती संस्थेच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्याध्यक्ष अविनाश घाटपांडे, सरचिटणीस रोहन दामले व संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका नेहा दामले आदी उपस्थित होते. संस्थेच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.

  भारतीय क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन
  “मल्लखांब, कबड्डी, खोखो, योगासने यांसारख्या भारतीय क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने लवकरच त्यासंबंधीच्या एका सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी केली जाणार अाहे. या सेंटरमध्ये भारतीय खेळांवर संशोधन व्हावे, तसेच या खेळांचे योग्य प्रशिक्षण विद्यार्थी व खेळाडूंना घेता यावे, यावर आमचा भर असेल. सेंटरसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा या ‘इनडोअर’ पद्धतीने विकसित केल्या जातील’’ असे गाेखले यांनी नमूद केले.

  क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळावा हे आमचे ध्येय

  ‘‘महाराष्ट्रीय मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा मिळावा हे आमचे ध्येय असून या दृष्टीने आम्ही पाऊले टाकायला सुरुवात करणार आहोत. वर नमूद सेंटर ऑफ एक्सलन्स बरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर आणि हाय परफॉर्मंस सेंटरही उभारण्यात येईल. या ठिकाणी खेळाडूंना आवश्यक न्यूट्रिशन, स्ट्रेन्थ ट्रेनिंग, स्पोर्ट्स थेरपी, स्पोर्ट्स सायंटिस्ट, बायोमेकॅनिक्स, स्पोर्ट्स सायकॉलॉजी आदी बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच या विषयांसंबंधी अभ्यासक्रम सुरु करून इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नजीकच्या भविष्यात आमच्या महाविद्यालायांमध्ये बीबीए सारखे अभ्यासक्रम देखील सुरु केले जातील. सध्या वाणिज्य शाखेचे पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयात उपलब्ध आहेत, अशी दामले यांनी दिली.
  चौकट :
  – दसऱ्याच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन, माजी विद्यार्थी होणार सहभागी
  – या शोभायात्रेत योगासने, मल्लखांब, लेझीम, लाठी-काठी यांची प्रात्यक्षिके होतील
  – दसऱ्याच्या दिवशी परंपरेनुसार पहाटे पाच वाजता टिळक रस्त्यावरील संस्थेच्या आवारात परंपरेप्रमाणे जोर मारण्याचा कार्यक्रम होईल.