इंदापूरकरांना आता पाटील नको अन् भरणेही नको; ‘हा’ नेता करणार तिसरा पर्याय जाहीर

इंदापूर तालुका (Indapur Taluka) तिसरा पर्याय शोधण्याच्या विचारात आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात तिसऱ्या पर्यायाचे नाव जाहीर केले जाईल, असे शिवसेना तालुकाप्रमुख महारुद्र पाटील (Maharudra Patil) यांनी सांगितले.

इंदापूर : इंदापूर तालुका (Indapur Taluka) तिसरा पर्याय शोधण्याच्या विचारात आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात तिसऱ्या पर्यायाचे नाव जाहीर केले जाईल, असे शिवसेना तालुकाप्रमुख महारुद्र पाटील (Maharudra Patil) यांनी सांगितले. ‘आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील नको आणि दत्तात्रय भरणेही नको’, अशी इंदापूर तालुक्यातील जनतेची भावना असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

इंदापूर शिवसेना कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधानक्षेत्र प्रमुख सुरज काळे, कार्याध्यक्ष रामचंद्र जामदार, अनिल कदम, शहर प्रमुख अशोक देवकर, वैभव जामदार, मारुती शेलार आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील ही नको आणि भरणे ही नको’, अशी प्रतिक्रिया इंदापूर तालुक्यातील जनतेची आहे. त्यामुळे तिसरा पर्याय निघाला पाहिजे. दोघांनी हवेत राहणे बंद करावे. युतीचे उमेदवार असताना तालुक्यात तिसऱ्या पर्याय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पाटील म्हणाले की, तालुक्यात दोन्ही पक्षात ताटातूट नाही. परंतु, हे जर नीट वागत नसतील तर तिसरा पर्याय नक्की असेल. राजकारण कसेही फिरू शकते, ही ज्या त्या वेळची परिस्थिती असेल, असेही त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात सर्व समाज घटकांना न्याय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जो अर्थसंकल्प मांडला, तसा अर्थसंकल्प गेल्या वीस-पंचवीस वर्षात मांडला गेलेला नाही. या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, अंगणवाडी सेविका तसेच सर्व समाज घटकांना न्याय देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारमधील सर्वांचे आभार मानतो, असे पाटील म्हणाले.