
आत्तापर्यंत शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून संघटनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आलो आहे. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीप्रमाणे आमचा वापर करून घेतला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे.
शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आत्तापर्यंत शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून संघटनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आलो आहे. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीप्रमाणे आमचा वापर करून घेतला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक हातकणंगले तालुक्यातील विशाल मंगल कार्यालय, चोकाक येथे पार पडली. केंद्र व राज्य सरकारचे शेतीविषयक धोरणातील फायदे व तोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील आंदोलनाची पुढील दिशा, स्वाभिमानी पक्षाची राजकीय भूमिका यासह विविध विषयावर दोन सत्राचे चर्चा सत्र पार पडले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, या सरकारकडूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांचीही पक्षातून हकालपट्टी केल्याचेही ते म्हणाले.
ऊस एफआरपी दोन टप्प्यात, शेतीला दिवसा वीजपुरवठा, पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यासह अनेक मुद्दयांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळत नसल्यांची खंत कार्यकर्त्याकडून व्यक्त होत होती.
…म्हणून आम्ही दलबदलू ठरत नाही
आम्ही भाजपच्याही मागे लागलो नव्हतो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला सोबत येण्याची विनंती केली होती. तर २०१९ ला महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी आम्हाला शरद पवारांनी विनंती केली होती. यामुळे आम्ही दलबदलू ठरत नाही. या दोघांनीही आम्हाला फसवलं आहे. आज आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत. त्यांचे आमचे सगळे सबंध संपले आहेत. हे मी आज राज्य कार्यकारिणी समोर जाहीर करतो आणि हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.