महाविकास आघाडीची वाटचाल बरखास्तीच्या दिशेने

सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त (Assembly Dismissed) होण्याच्या दिशेने असल्याचे ट्वीट संजय राऊत यांनी केले. बघू कोणाकडे किती आमदार आहेत, तुम्ही उगाच उतावळे होऊ नका, असा इशारा राऊत यांनी दिला.

    मुंबई : शिवसेनेचे बंडखोर (Shivsena Rebellion) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली ३७ ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुंबईत दाखल झाले असून भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    एकनाथ शिंदेंनी जवळपास ३५ आमदारांसोबत बंड करत सेनेला आव्हान दिले असून पर्यायाने हे महाविकास आघाडीलाच आव्हान आहे. बच्चू कडू, शंभूराज पाटील यांच्यासारखे मंत्रीही या बंडात सहभागी झाले आहेत. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सेनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही एकनाथ शिंदेंना फोन कॉल केला असून दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती राऊतांनी दिली.

    सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त (Assembly Dismissed) होण्याच्या दिशेने असल्याचे ट्वीट राऊत यांनी केले. बघू कोणाकडे किती आमदार आहेत, तुम्ही उगाच उतावळे होऊ नका, असा इशारा राऊत यांनी दिला. सध्या आमच्याकडे संख्याबळ आहे. हा आमच्या घरातला विषय आहे. एकनाथ शिंदे आणि अन्य सहकाऱ्यांसोबत माझे बोलणे चालू आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) कोणी नाराज आहे असे मला वाटत नाही. एकनाथ शिंदेंबरोबर माझे सकाळीच बोलणे झाले. आमचा एक तास फोन कॉल झाला. काही समज गैरसमज असतात. पण जास्तीत जास्त काय होईल, तर सरकार जाईल, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे.