eknath shinde

शिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

    मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबुक संवादनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट ( Eknath Shinde ) केले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi government ) फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले आहे. शिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.


    एकनाथ शिंदे नॉट रीचेबल झाल्यानंतर कालपासूनच राज्याचं राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशात विविध घडामोडी या काळात घडल्या आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणावर आत्तापर्यंत एकनाथ शिंदेंनी चार ट्विट करत आपले मत मांडले आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, अशा आशचा पहिला ट्विट शिंदेंनी केला. त्यानंतर विधिमंडळ मुख्य प्रतोद पदावरही त्यांनी ट्विट केले. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनतर नुकतचं त्यांनी दोन ट्विट करत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.