महाविकास आघाडीचा ‘दुष्काळी मोर्चा’! चांदवड, देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी 

चांदवड व देवळा तालुक्यातील बहुतांशी गावांची पिक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. तसेच चांदवड व देवळा तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो. यावर्षी दोन्ही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. चांदवड-देवळा तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

    चांदवड : पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चांदवड व देवळा तालुक्यातील पिके धाेक्यात आली आहेत. बहुतांश गावांची आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्याबराेबरच शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याने चिंताक्रांत आहे. त्यामुळे चांदवड व देवळा तालुके राज्य शासनाने दुष्काळी जाहीर करून तत्काळ दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात या मागणीसाठी चांदवड तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.६) रोजी सकाळी ११ वाजता दुष्काळी मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्या दरम्यान राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, चांदवड व देवळा तालुक्यातील बहुतांशी गावांची पिक आणेवारी ५० पैशांच्या आत आहे. तसेच चांदवड व देवळा तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो. यावर्षी दोन्ही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. चांदवड-देवळा तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुष्काळाची भयानकता बघता, यावर्षी दोन ते तीन वेळा पेरणी करुनही उभी पिके जळालेली आहे. असे असतांनाही शासनाकडुन जाहीर केलेल्या दुष्काळ यादीत चांदवड व देवळा तालुक्याचा समावेश नसल्याने तालुक्यातील शेतक-यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. चांदवड व देवळा तालुक्यातील दुष्काळ कुणालाचा दिसला नाही का ? असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहेत. तसेच चांदवड-देवळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी बघ्याची भुमिका घेतल्याने या तालुक्यातील जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे चांदवड व देवळा तालुका दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे म्हटले आहे.

    माेर्चात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, सोमनाथ पगार, समाधान जामदार, दत्तात्रय वाघचौरे, उत्तम ठोंबरे, विक्रम जगताप, अनिल पाटील, शैलेश ठाकरे, प्रकाश शेळके, राहुल कोतवाल, अल्ताफ तांबोळी, जाहिद घासी, रत्नदीप बच्छाव, शंभू खैरे, गुड्डू खैरणार, प्रसाद प्रजापत, साहेबराव ठोंबरे, सुभाष शिंदे, डॉ. शामराव जाधव, शहाजी भोकनळ, भीमराव जेजुरे, प्रदीप आहेर, शिवाजी कासव, निलेश कोतवाल आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    -या आहेत मागण्या
    चांदवड देवळा तालुके दुष्काळी घोषीत करा; कांदा अनुदान वितरणाची प्रक्रिया जलदगतीने राबवून शेतक-यांच्या खात्यावर संपूर्ण कांदा अनुदान वर्ग करा; सरसरकट पिक विमा भरपाई देण्यात यावी; शेतक-यांना १०० टक्के सरसकट कर्ज माफी देण्यात यावी; सन २०२१ साली व मागील वर्षात अति पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना भरपाईची रक्कम त्वरित देण्यात यावी; दुष्काळग्रस्त शेतक-यांचे १०० टक्के वीज बिल माफ करुन विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी माफ करावी, चांदवड व देवळा तालुक्यासाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवावे; जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा; कांद्याची अनिर्यात बंदी उठवावी; मका पिकास ४ हजार तर सोयाबीनला ८ हजार रुपये हमीभाव द्यावा.