सांगलीत महाविकास आघाडीचा किल्ला मजबूत ; ३८ जागांवर यश, महायुतीला ३३ तर स्थानिक आघाड्यांची १३ गावात सत्ता

८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाने ३८ गावांत सत्ता मिळवली. तर ३३ गावांत भाजप, शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून, १३ ठिकाणी स्थानिक आघाड्यांची सत्ता आली आहे. बहुतांश ठिकाणी सत्ता अबाधित राखण्यात नेत्यांना यश आले.

    सांगली : जिल्ह्यातील थेट सरपंच निवडीमुळे प्राथमिक माहितीनुसार, ७ ठिकाणी सत्ता एकाची आणि सरपंच वेगळ्या गटाचा अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही आकडेवारी सदस्यसंख्येच्या आधारावर असली तरी अनेक गावांत विविध पक्ष व गटांनी आमचीच सत्ता, असा दावा केला आहे.

    भाजप खासदार संजय पाटील यांचे समर्थक तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर यांनी हरिपूरची सत्ता राखली. त्यांनी काँग्रेसच्या मोहिते गटाचा पराभव केला. मोहिते गटाने सहा जागा जिंकत तांबवेकर यांच्या एकहाती सत्तेसमोर आव्हान निर्माण होईल, एवढी लढत दिली. नांद्रे गावात काँग्रेसचा वरचष्मा कायम राहिला, कुंडल (ता. पलूस) या सर्वांत मोठ्या गावात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अरुण लाड यांच्या गटाने मोठे यश मिळवले. काँग्रेसच्या महेंद्र लाड गटाने केवळ तीन जागांवर यश मिळवले.

    आटपाडी तालुक्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रभाव वाढल्याचे दिसून आले. खानापूर तालुक्यात बाबर- पाटील गटाने दोन-दोन ग्रामपंचायती जिंकल्या. जत तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपला प्रभाव कायम राखला. शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या समर्थकांनी भाजप समर्थकांच्या दुप्पट यश मिळवले. कवठेमहांकाळ तालुक्यात आर. आर. आबा गट आणि घोरपडे गटाने सात-सात गावांत सत्ता मिळवली, तेथे भाजपची पीछेहाट झाली आहे.

    मनसेचा झेंडा कायम
    स्थानिक स्वराज्य संस्थेत मनसे पक्षाला अजून म्हणावे तितके यश आलेले नाही, आशा परिस्थितीत शिराळा तालुक्यातील सावंतवाडी ही पूर्ण सत्ता असणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत होती, ही सत्ता अबाधित ठेवून मनसेकडे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असून, ती या वेळीही कायम ठेवण्यात जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना यश मिळाले.

    ग्रामपंचायत निकालाचे तालुकावार चित्र
    तालुका——महाविकास—–महायुती—-स्थानिक आघाडी
    शिराळा—–१३ (राष्ट्रवादी)—-७ (भाजप)—–५ (मनसे १)
    आटपाडी—-०————-११ (भाजप ७ सेना ४)—–३
    वाळवा——-३ (राष्ट्रवादी)——०————१
    कवठेमहांकाळ—-१४ (राष्ट्रवादी ७, घोरपडे ७)—२ (भाजप)—२
    जत—————०————-५ (भाजप)——-०
    मिरज———–४ (कॉग्रेस)——-१ (भाजप)——-०
    खानापूर——–०———-४ (२ अजितदादा)—–०
    तासगाव——–०———-२ (भाजप)————-०
    कडेगाव—–२ (कॉग्रेस)—–१ (भाजप)————-०
    पलूस—–२ (कांग्रेस १२, राष्ट्रवादी १)—१ (भाजप)–०
    एकूण——–३८——३३———-१३