महावितरणचा वीजचोरांना दणका; एकाच दिवशी ८३ लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड

पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत १२५१ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे.

    पुणे : पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत १२५१ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या ९९३ वीजचोऱ्यांचा समावेश आहे.

    नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तर कलम १२६ प्रमाणे अनधिकृत वीजवापराचे २५८ प्रकार आढळून आले आहेत.

    वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरु आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रात एकाच दिवशी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले. त्यानुसार पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि. ४) वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रादेशिक संचालक नाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

    पुणे प्रादेशिक विभागातील एकदिवसीय विशेष मोहिमेत १२५१ ठिकाणी ८२ लाख ४२ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे. वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरु असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक नाळे यांनी दिले आहेत.