विज जोडणी न देताच महावितरणाने शेतकऱ्याला पाठवलं बिल, किती आहे आकडा? : जाणून घ्या सविस्तर

महावितरण या विभागात काहीही होऊ शकतं? याचे उदाहरण आम्ही तुम्हाला देणार आहोत. चार वर्षापूर्वी कोटेशन भरुनही कृषी पंपासाठी पालम तालुक्यातील शेखराजूर येथील शेतकऱ्यास वीज डिपी मंजूर होऊनही जोडणी दिलीच नाही. उलट अव्वाच्या सव्वा वीज बील शेतकऱ्याच्या माथी मारले आहे.

    परभणी : महावितरण कंपनीचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण महावितरण या विभागात काहीही होऊ शकतं? याचे उदाहरण आम्ही तुम्हाला देणार आहोत. चार वर्षापूर्वी कोटेशन भरुनही कृषी पंपासाठी पालम तालुक्यातील शेखराजूर येथील शेतकऱ्यास वीज डिपी मंजूर होऊनही जोडणी दिलीच नाही. उलट अव्वाच्या सव्वा वीज बील शेतकऱ्याच्या माथी मारले आहे. गेल्या चार वर्षापासून सदर शेतकरी वीजबील रद्द करण्याची मागणी करत महावितरणच्या कार्यालयात खेटे मारत आहे.

    पालम तालुक्यातील शेखराजूर येथील शेतकरी नागनाथ रघुनाथ खेडकर यांनी २० नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांच्या सर्वे नं. १६० / अ मध्ये १ हेक्टर ८८ आर या कोरडवाहू शेतामध्ये मुलाच्या नावे अर्ज करुन कृषीपंपासाठी वीज डिपीसाठी कोटेशन भरले होते. त्यांना डिपी मंजूर झाल्यामुळे अनामत रकमेपाटी खेडकर यांनी ७ हजार ९४८ रुपयांचा भरणाही केला होता. त्यांचा अर्ज क्र. ११४०५२५ असा अजून ग्राहक क्र. ५३५५००००३१२१ असा आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना डीपीस वीज जोडणी मिळाली नाही. गेल्या दोन वर्षापासून खेडकर हे महावितरण कंपनीच्या पालम, परभणी कार्यालयात खेटे मारत आहेत. मात्र अद्यापही जोडणी दिली नाही.

    दरम्यान १२ नोव्हेंबर २०२१ रोजी २० हजार ८१० रुपयांचे वीजबील पाठवले. यावर कहर म्हणजे पुन्हा जोडणी न देतास नाथनाथ खेडकर यांना ३२ हजार २२० रुपयांचे वीजबील पाठवून झटका दिला आहे. असं एकूण ५३ हजार ३० रुपयांचं बिल पाठवलं. जोडणीच नाही तर वीज बील का भरायचं ? असा सवाल सदर शेतकरी करत आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी कसलीही दाद देत नाहीत. अशामुळेचं त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

    अशात महावितरणने शेखराजूर येथील शेतकऱ्यास वारंवार अव्वाच्या सव्वा वीज बील पाठवून चिंतेत टाकले आहे. अल्पभूधारक असलेल्या नाथनाथ खेडकर आणि त्यांच्या मुलासमोर शेती व्यवसाय करावा कसा असा प्रश्न उभा राहिला आहे. वीज बील भरावे की, शेती करावी, असा प्रश्न खेडकर कुटूंबासमोर उभा राहिला आहे. कृषीपंपाच्या डिपीस वीज जोडणी देऊन सदरचे वापरात न आलेले बील रद्द करावे, अशी मागणी पितापुत्र महावितरणच्या अधिकाऱ्याकडे करत आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्याची वारंवार मागणी खेडकर यांनी केली आहे. चार वर्षापासून पाठपुरावा केल्यानंतर महावितरणच्या आता अधिकाऱ्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली आहे.

    दरम्यान १ फेब्रुवारी २०२२ रोजी पालत महावितरण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता ए. व्ही. करीवार, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एल. कळसकर, जी. व्ही. क्षीरसागर या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदरचे काम अपूर्ण असल्याचा अभिप्राय कार्यकारी अभियंता देण्यात आला आहे. मात्र अजूनही नागनाथ खेडकर या शेतकऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. अजूनही त्यांचे वीज कार्यालयात खेटे मारणे सुरुच आहे. कृषीपंपाच्या डीपीस वीज जोडणी देऊन बील रद्द करण्याची मागणी खेडकर यांनी केली आहे.