फसव्या मोदी गॅरंटीमुळे महायुतीचा उमेदवार अडीच लाख मतांनी पराभूत होईल – खा.विनायक राऊत

महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करूयात, खासदार विनायक राऊत यांच्या 'लेखा जोखा' या कार्यहवाल पुस्तकाचे प्रकाशन

  संसदपटू बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू, सुधीर सावंत यांना डोळ्यासमोर ठेवून खासदार म्हणून आतापर्यंत काम केले आहे. विरोधी पक्षांमध्ये बसून सुद्धा जनतेच्या सर्व प्रश्नांवर संसदेत आवाज उठविला आहे. कधीही कमी पडलो नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, विलासराव देशमुख हे लोकनेते आहेत. सध्याचा मोदी गॅरंटीचा जमाना चालला आहे. मात्र, याच गॅरंटीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अडिच लाख मतांनी पराभूत होईल. आमची महाविकास आघाडी आतापुरतीच नाही. तर लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत ती कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करूया. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही मी कार्यरत राहीन असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

  कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या ‘लेखा जोखा’ या कार्यहवाल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जान्हवी सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत, अतुल रावराणे, संग्राम प्रभुगावकर, भाई गोवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, नागेश मोरये, सायली पाटकर, नितिषा नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  विनायक राऊत पुढे म्हणाले, लवासा सारखे आंबोली येथे २७ बंगले बांधले आहेत. तिथे दीपक केसरकर सिंधूरत्न योजनेमधून रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करीत होते. त्याचा भांडा फोड आम्ही केला. प्रमोद जठार माझ्यावर टीका करीत आहेत. मात्र, होय मी खलनायकच आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली सामान्य जनतेला देशोधडीला लावून भूमाफियाना साथ देणाऱ्यांना मी विरोध केला. त्यामुळे मी खलनायक आहे. जनतेच्या हितासाठी मी लढत राहीन, मग मला कितीही वेळा खलनायक म्हटले तरी चालेल. संसदेत मी आवाज उठवल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाली, हे लक्षात ठेवा. मोदींनी स्वतःसाठी आमचा खासदार निधी थांबवून साडेसात हजार कोटींचे विमान आणले. हे जनतेला आता सांगावे लागेल.

  आघाडीमध्ये कोणीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यात फरक पडणार नाही. लोकसभा मतदार संघात चार मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना इथे आणावे लागते, हे दुर्दैव आहे. आमच्यावर अन्याय आणि अत्याचार गोवा राज्याला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लक्षात ठेवावे की, त्यांचे गोवा राज्य आमच्या लोकांवर आवलंबून आहे. त्यामुळे आधी गोवा उभारा आणि मग सिंधुदुर्गात या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बेसावध आणि बेफिकीर राहू नये, प्रत्येक घराघरात जावून आपला विचार पोहचवावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  पुढे ते म्हणाले, नितेश राणे यांच्या सख्या भावाने गुहागर येथील सभेत सर्व विकार बाहेर टाकला. त्या व्यासपीठावर महिला होत्या. तरीही त्याचे भान राखले नाही. प्रमोद जठार तुम्ही रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली जमिनीचे कमिशन घेऊन जनतेला फसवण्याचे काम केले. त्याला रोखणारा मी खलनायक आहे. तुम्ही किती शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे दिले नाहीत? ते जनतेला सांगा. दिल्लीत माझा बंगला नाही, तुमचे सर्वाचे घर आहे. या विनायक राऊत यांची गेल्या १० वर्षात वडिलोपर्जित जमीनीपेक्षा किती जमीन वाढली आहे. ते मला दाखवावे. तसेच वाढलेली जमीन राणे कुटुंबीयांनी घ्यावी. मंत्रीपद भोगूनही उदय सामंत यांना शक्य झाले नाही ते आम्ही करून दाखवले. आंबोली येथे २७ बंगले कायदा भंग करत बांधले आहेत. त्याबाबत विचारणा केली नाही. त्यामुळे आंबोलीतील त्या ठिकाणी दीपक केसरकर गेले तिथे त्यांना ग्रामस्थांकडून प्रसाद मिळाला. प्रमोद जठार यांनी माझा लेखा जोखा चष्मा लावून वाचावा. त्यामुळे मी काय केले ते त्यांना समजेल.

  विकास सावंत म्हणाले, खा.राऊत केव्हाही शिवराळ भाषा वापरत नाहीत. संस्कृती आणि संस्कार त्यांच्यामध्ये आहेत, विरोधकांनी टोकाची टीका केल्यानंतर पण ते त्यांच्याशी चांगलेच वागत आहेत. मोदींना सकाळी उठल्यावर प्रथम काँगेसच दिसत आहे. अबकी बार ४०० पार ही भाजपची घोषणा अत्यंत घातक आहे. भाजप मधील ७७ खासदार हे मूळ काँगेसचे आहेत. ते संधीसाधू आहेत असे शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांची जुलूम शाही चालली आहे. त्याचा लेखा जोखा मांडण्यासाठी आपण जनतेसमोर गेलो पाहिजे. महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत, सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी मनोगत व्यक्त केले. भालचंद्र दळवी यांनी सूत्रसंचालन केले.