Lalit Patil
Lalit Patil

  पुणे : ससून ड्रग्ज प्रकरणी (Sasoon Hospital Drug Racket) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ललित पाटील (Lalit Patil) याने अनेक पोलिसांना तुरी देऊन ससूनमधून (Sasoon Hospital Drug Racket) पलायन केल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचबरोबर ससूनचे अधिष्ठाता तथा डीन यांचे या प्रकारावरील मौन आणि यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप त्यामुळे हे प्रकरण चांगले तापल्याने आता पोलीस या प्रकरणात रडारवर आले आहेत. मुंबई पोलिसांनी आता प्रमुख आरोपीला पकडल्यानंतर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
  ३ यंत्रणांवर संशयाची सुई
  पुण्यातून उघडकीस आलेले व ३ यंत्रणांवर संशयाची सुई ठेवणाऱ्या ड्रग्स रॅकेट प्रकरणात रुग्णालयातून उपचार घेत असताना पळालेला आणि या ड्रग्स रॅकेटचा केंद्रबिंदू ठरलेल्या ललित पाटीलसाठी पुणे पोलीस ‘धावले’ खरे पण, मुंबई पोलिसांनी त्याला ‘पकडले’. आता आपसूकच पुणे पोलीस त्याचा ताबाही घेतील, परंतु एक मोठं रॅकेट उघडकीस आणणारे पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणातील काही टप्यावर अपयशी ठरले. १५ ते १६ दिवसांच्या फरार नाट्याने अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सर्व माहिती अन्ा् सतत ललितच्या मागावर असलेल्या पुणे पोलिसांना मोठ्या यशानंतर अपयशच आल्याचे दिसत आहे.
  ससून हॉस्पिटलमध्ये राहूनच अय्याशी
  ललिलत पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये राहूनच कधी सिगरेटचे झुरके, कधी फाईव्हस्टार हॉटेलमध्ये गर्लफ्रेन्डसोबत रोमॅन्स, तर कधी मॉलमध्ये शॉपिंग… असे कारनामे करायचा. तो फक्त नावालाच ससूनमध्ये  असलेल्या पण मुक्तसंचार करणाऱ्या ललित पाटीलचा (Lalit Patil). 2020 पासून येरवडा तुरुंगात असणाऱ्या ललितने आजारपणाचं कारण पुढे केलं आणि ससूनमध्ये आपल्या मुक्काम हलवला. तिथे त्याच्यावर उपचार होणं अपेक्षित होते, पण झालं भलतंच.
  नित्यनेमाने ससूनबाहेर पडायचा
  ललित नित्यनेमाने ससूनबाहेर पडायचा, आपल्या गर्लफ्रेन्डला भेटायचा आणि अय्याशीचे इमले बांधायचा. या सगळ्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. ललित पाटीलसोबत असणारी मुलगी ही प्रज्ञा कांबळे. पेशाने ललितची वकील आणि नात्याने गर्लफ्रेन्ड. तर दुसरी मुलगी अर्चना निकम. अशा दोन मैत्रिणींसोबत ललित रासलिला रचत होता.
  ड्रग्जचा पैसे मैत्रिणीवर खर्च 
  मेफेड्रोनच्या विक्रीतून येणारे पैसे ललित पाटील प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या त्याच्या दोन मैत्रिणींवर खर्च करत होता. ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर ललित नाशिकला जाऊन आधी या दोघींना भेटला आणि त्यानंतर गुजरातला पसार झाला. त्यानंतर तो सतत या दोघींच्या संपर्कात होता आणि या दोघी त्याला पळून जाण्यासाठी मदत करीत होत्या हे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघीनांही अटक केली.
  जामीन मिळवण्याची जबाबदारी प्रज्ञा कांबळेवर 
  मुद्दा असा आहे की, या दोघी ललित पाटीलच्या फायनान्सर बनल्या तरी कशा? प्रज्ञा कांबळे ही व्यवसायाने वकील आहे. ललित पाटील आणि त्याची टोळी कुठल्या गुन्ह्यात पकडली गेली तर त्यांना जामिनावर बाहेर काढण्याची जबाबदारी प्रज्ञा कांबळेवर असायची. ललित पाटीलची आधी दोन लग्ने झालेली आहेत हे माहीत असताना देखील प्रज्ञा कांबळे त्याची गर्लफ्रेंड बनली. अनेकदा येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांना फितवून त्यांच्या मोबइलवरून दोघांचं बोलणं व्हायचं आणि ड्रग रॅकेटची पुढची दिशा ते ठरवायचे.
  ललित पाटील आणि त्याच्या अय्याशीचे हे फोटो पुणे पोलीस आणि ससून व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. शिवाय पकडल्या गेल्यावर ललितने गौप्यस्फोट करण्याची धमकी दिली आहे.
  या अनेक प्रश्नांची उत्तरे काय?
  पण प्रश्न असा आहे की ललित पाटील ससूनमध्ये धूम्रपान कसा करत होता? ललित पाटीलकडे मोबाईल कुठून आला? मोबाईल वापरण्याची परवानगी त्याला का दिली? पोलिसांच्या नाकाखाली त्याच्या रासलीला सुरू होत्या… तेव्हा त्याला कुणी का अडवलं नाही? फाईव्ह स्टार हॉटेल, मॉलमध्ये शॉपिंग करताना पोलीस प्रशासन कुठे होतं? ललितच्या डोक्यावर कुण्या बड्या माणसाचा हात आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधली तर नक्कीच ललितच्या लीलांचा उलगडा होईल.
  ललित पाटीलचे बाहेर आलेले हे फोटो महाराष्ट्रातील तुरुंगाचं वास्तव मांडणारे आहेत. पैसे असतील तर तुरुंगात सर्व काही मिळते हे सामान्यांच्या तोंडी असलेल्या वाक्याला आणखी बळ देणारे आहेत. खरं तर ललित पाटीलमुळे वर्षानुवर्षं सुरु असलेले अनेकांचे काळे धंदे समोर आलेत. त्यामुळे एखाद्या दुसऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई चालणार नाही तर ललितसारखा गुन्हेगार कायद्याला अशा प्रकारे वाकुल्या दाखवू शकणार नाही यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. ललित पाटील प्रकरणाने खरं तर या यंत्रणांच्या साफसफाईची संधी चालून आली आहे.