मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी करणारा मुख्य सूत्रधार कोल्हापूर जिल्ह्यातील

रियाज हा शिरोली येथे पुणे-बंगळुरु महामार्गालगत पश्चिम बाजूला अलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो. माध्यमिक शिक्षण शिरोली हायस्कूलमध्ये झाले. १९९६ साली दहावी शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असतानाही तो शाळेत टगेगिरी करत होता.

    कोल्हापूर : राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रिपद (Cabinet Ministry) मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल १०० कोटी रुपयांची मागणी करणारा मुख्य सूत्रधार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली (ता. हातकणंगले) येथील रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, रा. जि.प. मराठी शाळा, महामार्ग शेजारी) हा असून, योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, रा. पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, रा. पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय ५३, रा. नागपाडा, मुंबई) असे त्याचे इतर तिघेजण साथीदार आहेत.

    रियाज हा शिरोली येथे पुणे-बंगळुरु महामार्गालगत पश्चिम बाजूला अलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो. माध्यमिक शिक्षण शिरोली हायस्कूलमध्ये झाले. १९९६ साली दहावी शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असतानाही तो शाळेत टगेगिरी करत होता. मोठ्या रुबाबात वागणे असायचे. त्याचे वडील अल्लाबक्ष हे कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील ट्रान्सपोर्टमध्ये ट्रकचालक होते.

    रियाज १९९६ नंतर शिरोली येथील एका व्हिडिओ सेंटरमध्ये कामाला लागला. यानंतर गावातच केबल ऑपरेटिंगची कामे करु लागला; पण रियाजला कमी वेळेत श्रीमंत व्हायचे होते. यातच तो कोल्हापुरातील एका मायनिंग उद्योजकाकडे कामाला लागला. तेथून काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःची मायनिंग सुरू केली. शाहूवाडी, गोवा येथे मायनिंगमध्ये पैसे मिळवले. अलिशान गाड्या घेतल्या, रुबाबात राहू लागला, विदेशी दौरे वाढले, जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांबरोबरही संबंध वाढवले.

    मुंबई-ठाणे येथील तीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन नवीन मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क ३ आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाहीतर आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. मोठ्या मंत्र्यांनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल, तर १०० कोटी रुपये द्यावे लागतील. त्यापैकी २० टक्के रक्कम आता द्यावी लागेल आणि उर्वरित मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्यावी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले.

    आरोपींनी सोमवारी आमदारांना नरिमन पॉईंटवर भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आमदारांनी त्यांना पैसे घेण्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये नेले. याबाबत संबंधित आमदारांनी याची मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून रियाज शेख या आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी आरोपींची नावे समोर आली. एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.