मेन राजाराम हायस्कूलचे स्थलांतर होणार नाही : दीपक केसरकर

कोल्हापूरच्या इतिहासातील देदीप्यमान वारसा असलेल्या मेन राजाराम हायस्कूलचे स्थलांतर होणार नाही, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

    कोल्हापूर : कोल्हापूरच्या इतिहासातील देदीप्यमान वारसा असलेल्या मेन राजाराम हायस्कूलचे स्थलांतर होणार नाही, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

    केसरकर म्हणाले, अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या सुविधांच्या अभावामुळे भाविकांना व विशेष करून महिलांची गैरसोय होते. त्यामुळे अशा सुविधा मंदिरात देण्याचा आमचा मानस आहे. यासंदर्भात मी या भागात असलेल्या सर्व शासकीय इमारतींची पाहणी केली होती. व मेन राजारामच्या ऐतिहासिक इमारतीस भेट दिली. या वास्तूमधील कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी ती सर्व कार्यालये शासकीय आहेत. त्याठिकाणी भाविकांना सुविधा निर्माण करण्यात येतील.

    सदर कार्यालयांमध्ये मेन राजारामच्या इमारतीचा समावेश नाही. हायस्कूलच्या स्थलांतरास कोणत्याही प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली नाही. मी मेन राजारामला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांबाबत आवश्यक बाबींची नोंद घेतली आहे. विद्यार्थ्यांना वर्षभरात सुविधा उभारण्यात येतील.

    मेन राजाराम ही फक्त वास्तू नसून तो कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. मेन राजारामची स्थापना १८७० मध्ये करण्यात आली. तेव्हापासून मेन राजाराममध्ये अनेक रथी, महारथी शिकले आहेत. त्यांनी फक्त देशात नव्हे, तर जगाच्या पाठीवर आपल्या नेतृत्वाचा आणि संशोधनाचा ठसा उमटवला आहे. महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, जागतिक किर्तीचे संशोधक जयंत नारळीकर असे दिग्गज या शाळेत शिकून मोठे झाले आहेत.