मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्ह्यात बोलबाला; प्रसूतीचे उद्दिष्ट केवळ पाच महिन्यात पूर्ण

    मायणी/सातारा : केवळ पाच महिन्यात शंभर प्रसुती करून दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करून खटाव तालुक्यातील मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल नुकताच सातारा येथे आयोजित जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्याचा गौरव करण्यात आला असल्याची माहिती मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख यांनी दिली .

    इतिहासात प्रथमच हा विक्रम

    डॉ. अमोल देशमुख यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे- एप्रिल २३ ते सप्टेंबर २३ अखेर एकूण शंभर प्रसूती या प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये करण्यात आल्या आहेत. आजपर्यंतच्या मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इतिहासात प्रथमच हा विक्रम नोंदविला आहे. एक वर्षासाठी १२० प्रसूतींचे उद्दिष्ट असताना केवळ पाच महिन्यात या प्रसुती करण्यात आल्या आहेत. कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत १६७ केसेसचे उद्दिष्ट होते.

    आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार

    त्यापैकी ९४ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. तसेच दर महिन्याच्या ९ तारखेस प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत सर्व महिलांच्या रक्त तपासण्या करण्यात येत असतात. यापूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रास सातत्याने आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    केंद्राचे सर्व कर्मचारी यांचे फार मोठे योगदान

    तसेच प्रजनन व बाल आरोग्य उपक्रमांतर्गत या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात दुसरा क्रमांक आला आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी प्रा. आ. केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. ओंकार ताटे,आरोग्य सेविका,आशा सेविका,आरोग्य सहाय्यक,स्टाफ सिस्टर,आरोग्य सहाय्यिका गटप्रवर्तक, वाहनचालक,प्रा. आ. केंद्राचे सर्व कर्मचारी यांचे फार मोठे योगदान आहे.