
म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाकी गावच्या परिसरात वाळू तस्करांकडून बेकायदेशीरपणे अहोरात्र सुरु असलेल्या वाळू तस्करीवर सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने माण महसूलच्या मदतीने पहाटे छापा टाकत कारवाई केली.
म्हसवड : म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील वाकी गावच्या परिसरात वाळू तस्करांकडून बेकायदेशीरपणे अहोरात्र सुरु असलेल्या वाळू तस्करीवर सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने माण महसूलच्या मदतीने पहाटे छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत ५ जणांविरोधात म्हसवड पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे वाळू सम्राटांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळ व माण महसूलकडून दिलेली अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील म्हसवड परिसरातील वाकी गावच्या हद्दीत रात्रदिवस मोठमोठ्या मशिनरींच्या साह्याने वाळूचे उत्खनन सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बन्सल यांना मिळाली होती. ही वाळू चोरी थांबवण्याचे आव्हान जिल्हा पोलीस प्रशासनासमोर उभे राहिल्याने पोलीस अधिक्षक बन्सल यांनी यासाठी एक पोलीस पथकाची नियुक्ती करीत या पथकाला सदर ठिकाणी कारवाईचे आदेश दिले.
या पथकाने माण महसूल विभागाला सोबत घेत शुक्रवारी भल्या पहाटे अचानकपणे त्या ठिकाणाला भेट देत कारवाई केली. पोलीस व महसूल विभागाच्या या कारवाईत लाखो रुपयांची वाहने जप्त केली असून, यामध्ये दोन पोकलॅन, एक डंपर व दोन ट्रॅक्टरचा समावेश आहे. या कारवाईत ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोकलॅनचालक कृष्णा बळीराम चोरमले (रा.बीड, जि. बीड), पोकलॅनचालक डेगलाल भुवनेश्वर राणा (रा.बारशिंगा, झारखंड) व ट्रॅक्टरचालक अनुक्रमे भैय्या मधुकर चव्हाण (रा. वर-म्हसवड), नामदेव गुलाबा शिंदे (रा.पानवण जि. सातारा) व डंपरचालक विजय धर्मा शिंदे (रा.ढाकणी ता. माण) या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद मार्डी मंडलाधिकारी सुनिल खेडेकर यांनी म्हसवड पोलिसांत दिली असून, या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तर उपविभागीय अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी, तहसीलदार सुर्यकांत येवले यासह मंडलाधिकारी मार्डी, दहिवडी, गोंदवले, म्हसवड, वाकी अशांचा समावेश होता.